बॉलिवूडमध्ये मसालापट म्हटल्यावर दिग्दर्शक रोहित शेट्टी आठवायलाच पाहिजे. महागड्या गाड्यांची आदळआपट, गाड्यांच्या ब्लास्टची दृश्ये त्याच्या चित्रपटात हमखास दिसतात. चित्रपटात एक तरी गाडी हवेत उडवलीच पाहिजे असा जणू अलिखित नियमच रोहितच्या चित्रपटांमध्ये असतो असं गमतीने म्हटलं जातं. अनेकदा रोहितचे चित्रपट हे फिजिक्स म्हणजेच भौकितशास्त्राचे ज्ञान, गुरुत्वाकर्षण, सामान्य विज्ञान यांसारख्या गोष्टींना बाजूला ठेऊन बघायचे असतात असंही मस्करीत म्हटलं जातं. या संदर्भात आधीही अनेकदा मीम्स व्हायरल झाले आहेत. आता कुख्यात गुंड विकास दुबे एन्काउंटर प्रकरणानंतर नेटकऱ्यांना पुन्हा तोच गाड्या उडवणारा रोहित आठवला आहे.

उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करुन फरार झालेला गँगस्टर विकास दुबे पोलीस चकमकीत ठार झाला आहे. गुरुवारी विकास दुबे पोलिसांच्या हाती लागला आणि त्यानंतर नाट्यमय घडामोडी घडल्या असून विकास दुबे ठार झाला. उत्तर प्रदेशांचं विशेष पोलीस पथक विकास दुबेला घेऊन कानपूरसाठी सकाळी निघालं होतं. यावेळी पोलिसांच्या ताफ्यातील एका वाहनाचा अपघात झाला आणि गाडी पलटली. गाडीचा अपघात झाल्यानंतर विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. विकास दुबे याने पोलिसांचं शस्त्र घेऊन गोळीबार करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी विकास दुबेला आत्मसमर्पण करण्यास सांगितलं. यादरम्यान झालेल्या चकमकीत पोलिसांनी विकास दुबेला ठार केलं.

ही संपूर्ण एन्काउंटरची घटना रोहित शेट्टीच्या चित्रपटाच्या स्क्रीप्टसारखीच वाटत असल्याची प्रतिक्रिया नेटकरी सोशल मीडियावर देत आहेत. यावरून बरेच हास्यास्पद मीम्ससुद्धा व्हायरल झाले आहेत. पलटलेली गाडी आणि रोहित शेट्टीचे चित्रपट असं भन्नाट कनेक्शन नेटकऱ्यांनी लावलं आहे.