News Flash

‘गारंबीचा बापू’जगावेगळा बापू आणि लोकविलक्षण राधा

श्री. ना. पेंडसे यांची ‘गारंबीचा बापू’ ही कादंबरी साठच्या दशकात प्रकाशित झाली आणि मराठी साहित्यात एक लोकविलक्षण प्रेमकहाणी जन्माला आली. तीही कोकणातील पारंपरिक, कर्मठ वातावरणात!

| April 21, 2013 01:17 am

श्री. ना. पेंडसे यांची ‘गारंबीचा बापू’ ही कादंबरी साठच्या दशकात प्रकाशित झाली आणि मराठी साहित्यात एक लोकविलक्षण प्रेमकहाणी जन्माला आली. तीही कोकणातील पारंपरिक, कर्मठ वातावरणात! यातल्या अफाट कर्तृत्वाच्या बापूमध्ये अनेकांनी स्वत:ला कल्पिले आणि राधासारखी विलक्षण प्रेयसी आपल्यालाही लाभावी असं चित्रही मनोमन रंगवलं. ‘गारंबीच्या बापू’ ची मोहिनी अनेक पिढय़ा टिकली. नव्हे, आजही टिकून आहे! म्हणूनच श्री. ना. पेंडसे यांना या कादंबरीचा पुढचा भाग ‘गारंबीची राधा’ लिहावा लागला. त्यात अर्थात पहिल्या कादंबरीतलं झपाटलेपण नाही. डोंगरदऱ्यांतून प्रचंड आवेगाने रोरावत येणारी नदी मैदानी प्रदेशात आल्यावर शांत, स्थिर व्हावी, तद्वत ही दुसरी कादंबरी असल्यानं वाचकांच्या वाढलेल्या अपेक्षांचा (कदाचित) तिनं भंग केला असावा. असो. पण पुढे श्री. नां. नी ‘गारंबीचा बापू’ हे नाटकही लिहिलं. आणि यातल्या बापूच्या आईवर स्वतंत्रपणे ‘यशोदा’ हे नाटकसुद्धा. या कादंबरीतल्या प्रमुख पात्रांवर स्वतंत्रपणे कलाकृती रचाव्यात, इतकी ही माणसं गुंतागुंतीची, गहन व गूढ आहेत. ‘गारंबीचा बापू’ नाटकालाही लोकांनी भरपूर वाखाणलं. म्हणूनच दोनदा पुनरुज्जीवित झालेलं हे नाटक ‘सुशीला एन्टरटेन्मेंट’ या संस्थेनं पुनश्च रंगभूमीवर आणलं आहे. ‘पीरियड प्ले’ म्हणून त्याचं महत्त्व आहेच, परंतु त्यातली हाडामासांची माणसं आणि त्यांचं जगणं हेही एका अभेद्य चक्रव्यूहाचा भेद करण्याइतकंच आव्हानात्मक आहे. आणि यासाठीच अशी नाटकं पुन: पुन्हा रंगभूमीवर यायला हवीत.
हर्णेच्या परिसरातलं गारंबी हे छोटेखानी गाव. इथल्या यशोदा-विठोबाच्या दारिद्रय़ात पिचणाऱ्या घरात बापूचा जन्म झाला. विठोबा हा निरुपद्रवी, सरळमार्गी माणूस. परिस्थितीनं पार वाकलेला. अण्णा खोतांच्या घरी पाणक्या असलेला. यशोदाचाही कामानिमित्तानं अण्णा खोतांच्या घरात सतत राबता. अठराविश्व दारिद्रय़ात जन्मलेल्या बापूचं मात्र आपल्या ब्राह्मण आळीपेक्षा गुरवांच्या वस्तीत जास्त उठणं बसणं. त्यामुळे समस्त ब्राह्मणांचा त्याच्यावर राग. विशेषत: अण्णा खोतांचा! तशात गुरव आणि ब्राह्मणांत उभा दावा. साहजिकच ब्राह्मण बापूचं गुरववाडय़ातलं उठणं-बसणं, त्यांच्याकडं खाणं ब्राह्मणांना खुपणारं.अशात गुरवांच्या यमीला दिवस गेल्याचं प्रकरण बापूवर शेकवलं जातं. बापूला वेसण घालण्यासाठी अण्णा खोतांनीच हे कुभांड रचलेलं असतं. काटय़ानं काटा काढावा तसं गुरवांना बापूच्या विरोधात फितवून त्याला आयुष्यातून उठवायचा अण्णांचा यात डाव असतो. वर साळसूदपणे पंचायतीत दंड भरून बापूला सोडवण्याचं केलेलं नाटक हाही त्याचा कटाचा भाग. बापू अण्णांना पुरेपूर ओळखून असतो. पण कात्रीत सापडल्याने तोही हतबल होतो. दंड भरल्यानं ‘त्या’ आळातून सुटका झाली असली तरी त्याच्यावरचा डाग गेलेला नाही हे बापू जाणून असतो. सतराशे साठ भागनडी करूनही गावात उजळ माथ्याने फिरणाऱ्या भ्रष्ट माणसांचा वीट येऊन बापू पुलावरच्या रावजीच्या हॉटेलात नोकरी पत्करतो आणि गाव सोडतो.
अस्थम्यानं बेजार झालेल्या रावजीला बापूच्या रूपात परीस सापडतो. बापूच्या मित्रमंडळींच्या राबत्याने त्याच्या हॉटेलला बरकत येते. रावजीची बायको राधालाही बापूचं नितळ माणूसपण भुरळ घालतं. विजोड रावजीच्या संसारात परिस्थितीनं आणून टाकलेल्या राधाला बापूचं पौरुष साद घालतं. बापूही या बुद्धिमतीकडे आकर्षित होतो. गारंबीत त्यांच्यातील जवळिकीची चर्चा सुरू होते. परंतु परस्परांबद्दल कितीही आकर्षण असलं तरी त्यांनी आपल्या मर्यादांचा भंग केलेला नसतो. बापूच्या मावशीच्या कानावर ही चर्चा जाते आणि ती बापूला जाब विचारायला रावजीच्या हॉटेलात येते. बापू खरं काय ते तिला सांगतो. तरीही तिची समजूत पटत नाहीच. असल्या उनाड गप्पांना आपल्या लेखी कुठलंही स्थान नाही असं बापू निक्षून सांगतो.
पण विठोबाच्या आकस्मात मृत्यूनं मात्र बापू हादरतो. त्याला दिलेलं वचन त्याला आठवतं. भरपूर पैसा कमवून विठोबाला सुखात ठेवायचं वचन! रावजीच्या हॉटेलात राहून हे वचन पूर्ण करता येणार नसतं. तो जड अंत:करणानं राधा आणि रावजीच्या हॉटेलचा निरोप घेतो.
मुसा काजीकडे पडेल ती कामं करून व्यापाराचं तंत्र बापू अवगत करतो. आणि एके दिवशी स्वत:चा व्यापार सुरू करून गडगंज पैसा करतो. दरम्यान, रावजीचा मृत्यू झालेला असतो. बापू राधाला पत्नी म्हणून स्वीकारतो. वयानं ती त्याच्यापेक्षा मोठी असली आणि विधीवत लग्न झालेलं नसलं तरीही मनानं ते पती-पत्नी झालेले असतात. बापू गावात शाळा, दवाखाना उघडतो. अनेक अडल्यानडलेल्यांना सढळ हस्ते मदत करतो. त्यामुळे राधा-बापूचं हे लोकविलक्षण नातं गावाला मंजूर नसलं तरी गावकरी त्याकडे दुर्लक्ष करतात. अण्णा खोतांच्या पोटात त्यामुळे खदखदत असतं.
आता बापूला सरपंच होण्याचे वेध लागलेले असतात. अण्णांच्या नाकावर टिच्चून त्यांना संपवण्यासाठी त्याला सरपंच व्हायचं असतं. राधा परोपरीनं त्याला समजवायचा प्रयत्न करते, की तू या नसत्या भानगडीत पडू नकोस. पण बापू हट्टाला पेटलेला असतो. साम-दाम – दंड – भेद अशा कुठल्याही मार्गानं त्याला सरपंचपद काबीज करायचं असतं. अण्णांचा सूड घेण्यासाठी! कारण आईचे आणि अण्णांचे अनैतिक संबंध त्याला आयुष्यभर छळत आलेले असतात. विठोबाच्या मृत्यूतही अण्णांचाच हात असावा असा त्याला संशय असतो. या साऱ्याचा हिशेब त्याला चुकता करायचा असतो.
पण..
श्री. ना. पेंडसे यांनी आपल्या कादंबरीचं केलेलं नाटय़रूपांतरही तितकंच प्रभावी आहे. त्यांच्या मूळ तीन अंकी नाटकाची मिलिंद पाठक यांनी दोन अंकी रंगवृत्ती केली आहे. विठोबाच्या मृत्यूचा प्रसंग वगळता ही रंगावृत्तीही तितकीच परिणामकारक झालेली आहे. दिग्दर्शक संजीव वढावकर यांनी त्याच संवेदनशीलतेनं प्रयोग बसवला आहे. ठसठशीत व्यक्तिरेखाटने, प्रसंगातील गतिमानता आणि नाटय़पूर्ण रचना, वातावरणनिर्मितीतील सच्चेपणा यामुळे  ‘गारंबीचा बापू’ प्रयोग उत्तरोत्तर रंगत जातो. ४०-५० च्या दशकांतील कोकणातील एका गावात घडणारं हे नाटय़ त्यातल्या ताणेबाण्यांसह अस्सलतेनं यात अवतरलं आहे. याचं श्रेय अर्थातच दिग्दर्शकाच्या प्रभावी हाताळणीला द्यायला हवं. सर्व कलाकारांच्या मन:पूत कामांमुळे प्रेक्षक कळत – नकळत नाटकात गुंतत जातात आणि प्रयोगाचा भाग बनून जातात. एक गोष्ट मात्र ज्या परिणामकारकतेनं नाटकात यायला हवी होती, तशी ती येत नाही, ती म्हणजे विठोबाचा मृत्यू! ज्या घटनेनं बापूचं सबंध आयुष्यच बदलवलं ती ही घटना! पण तिचा अपेक्षित परिणाम नाटकात प्रत्ययाला येत नाही. त्याचप्रमाणे आपल्या कर्तृत्वावर मोठा झालेला बापू बंगली बांधतो. तीही यात गायब आहे. तिच्या साक्षीनंच पुढे अनेक घटना घडतात.
नेपथ्यकार बाबा पार्सेकर यांनी कोकणातील घराचं उभारलेलं अस्सल वास्तववादी नेपथ्य प्रथमदर्शनीच वातावरणनिर्मिती करतं. रावजीचं हॉटेलही कोकणातल्या ‘गरीब’ हॉटेलची आठवण देणारं. दुसऱ्या अंकात बापूची बंगली मात्र सूचकतेनं साकारली आहे; ती खटकते. सुनील मेस्त्रींनी प्रकाशयोजनेतून नाटय़ांतर्गत भावनिक आंदोलनं व्यवस्थित अधोरेखित केली आहेत. नंदू घाणेकरांच्या पाश्र्वसंगीताची त्याला उचित साथ मिळाली आहे. वेशभूषा आणि रंगभूषेनं पात्रांना त्यांचं त्यांचं व्यक्तिमत्त्व बहाल केलं आहे.
अंगद म्हसकर यांनी बापूचं मनस्वीपण प्रत्ययकारीतेनं दर्शवलं आहे. त्याची घुसमट, चीड, त्याचं नितळ माणूसपण आणि राधेच्या सहवासात खुललेली त्याची उदात्त, उत्कटता हे सारं त्यांनी शब्दांतून आणि देहबोलीतून तरलतेनं व्यक्त केलं आहे. त्याचं अफाटपण मात्र नाटकात कुठंच येत नाही. किंबहुना नाटकातूनच ते वगळल्यासारखं वाटतं. तेही तितक्याच उंचीनं येतं तर हा बापू कुठल्या कुठं गेला असता. शीतल क्षीरसागर यांनी बुद्धिमती, रॅशनल विचारांची राधा तिच्या सगळ्या भावविभ्रमांसह उत्तम साकारली आहे. राधाचा आत्मा त्यांना गवसला आहे. प्रारंभीची रावजीच्या पिचल्या संसारात कोंडमारा होऊनही आपलं सत्व शाबूत ठेवणारी अन् नंतर बापूच्या सान्निध्यात आल्यावर सर्वार्थानं निर्भर झालेली राधा, आपल्यातल्या माणुसकीनं सर्वाची मनं जिंकणारी, बापूचं कर्तृत्व फुलविणारी आणि वेळप्रसंगी त्याला ताळ्यावर ठेवणारी राधा.. असे राधाचे सर्व पैलू शीतल क्षीरसागर यांनी त्यातल्या गहिरेपणासह सुंदर अभिव्यक्त केले आहेत.
त्याचवेळी राधेमधली प्रेमिकाही त्यांनी उत्कटतेनं जपली आहे. संध्या म्हात्रे यांची मावशी हा अस्सल कोकणी नग आहे. तिचं खाष्टपण, तोंडाळवृत्ती, ‘अरे’ला ‘का रे’ करण्याची धमक आणि व्यावहारिक शहाणपण, बापूसाठीची अंतरीची माया हे सारं सारं त्यांनी धडाक्यानं व्यक्त केलं आहे. रसिका धामणकर यांनी बापूच्या आईची चंचलता, अण्णांच्या तालावर नाचणारी कठपुतळी आणि त्यापायी संसाराकडे झालेलं तिचं दुर्लक्ष, नवऱ्याला क:पदार्थ मानण्याचा उन्मत्तपणा हे सगळं दाखवत असतानाच आपल्या अनैतिक करणीचा कुठंतरी ठुसठुसणारा अपराधी भावही तिच्या चोरटेपणी वावरण्यातून दाखविला आहे. बापूचं नितळ माणूसपण प्रत्ययाला आल्यावर तिनं केलेला त्याच्या जन्मरहस्याचा गौप्यस्फोट आणि अण्णा खोतांना धडा शिकविण्याचा व्यक्त केलेला सूड निर्धार – यातून यशोदेच्या अंतर्मनातली खळबळही अखेर बाहेर पडते.
संजीव वढावकरांनी दिसण्या-असण्यातून बापुडवाणा विठोबा सच्चेपणानं वठवला आहे. त्याचं मूक रुदन त्यांच्या शरीरबोलीतून अबोलपणे आपसूक व्यक्त होतं. रमेश रोकडे यांनी बापूचा मित्र आणि हितचिंतक दिनकर त्याच्या स्वभावगत पडखाऊ वृत्तीसह छान साकारला आहे. प्रसंगी माणुसकीच्या बाजूनं उभं राहायचं धैर्यही त्यानं राधा-बापूच्या जगावेगळ्या नात्याचा स्वीकार करून दाखवलं आहे. अस्थम्यानं त्रस्त रावजी- नंदकुमार सावंत यांनी यथार्थपणे उभा केला आहे. राजेंद्र पटवर्धनांचा ‘सरशी तिथे पारशी’ छापाचा पांडू भट कोकणी बिलंदरपणाचा अस्सल नमुना ठरावा. त्यांचे सानुनासिक उच्चार त्यांच्या बेरकीपणाला साथ देतात.
श्री. ना. पेंडसे यांची ‘गारंबीचा बापू’ न वाचलेल्यांना हे नाटक ५० च्या दशकातील कोकणातील एका जगावेगळ्या प्रेमकहाणीचा प्रत्यय तर देईलच, परंतु ज्यांनी त्याची पारायणं केलेली आहेत त्यांनाही ते पुन:प्रत्ययाचा अपार आनंद देईल यात बिलकूल शंका नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2013 1:17 am

Web Title: garimbicha bapu bapu differenet than world and radha out of the world
टॅग : Drama,Entertainment
Next Stories
1 संवादापलीकडे..
2 गोष्ट चित्रपट वेडय़ा तंबू मालकाची..
3 ‘मिर्झा-साहिबान’ पटकथेला ‘गुलजार’ स्पर्श
Just Now!
X