मालिका-चित्रपट आणि रंगभूमी गाजवणारी अभिनेत्री गिरिजा ओक-गोडबोले पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली असून छोटय़ा पडद्यावर ती प्रथमच पदार्पण करते आहे. यावेळी हा ‘छोटा पडदा’ टेलिव्हिजनचा नसून तिच्या पहिल्या लघुपटाचा आहे. हिंदी-मराठी चित्रपट आणि मालिका, जाहिराती, नाटकांमध्ये भूमिका केल्यानंतर तिने प्रथमच मराठी लघुपटात काम केले आहे. नवज्योत बांदिवडेकर याने दिग्दर्शित केलेल्या ‘क्वॉर्टर’ या लघुपटात गिरिजा दिसणार आहे. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये हा लघुपट प्रसिद्ध होणार आहे. शीर्षकावरून लघुपटाच्या विषयाचा मागोवा घेता येत नसला तरी या लघुपटाच्या माध्यमातून गिरिजाचे वेगळे रूप आणि अभिनय पाहायला मिळणार असल्याची ग्वाही निर्मात्यांनी दिली आहे. ‘नेविअन्स स्टुडिओ प्रा. लि.’ या निर्मिती संस्थेअंतर्गत नम्रता बांदिवडेकर यांनी या लघुपटाची निर्मिती केली आहे. कथा आणि संवादलेखनाचे काम आलाप भागवत यांनी केले आहे.

कमी वेळात खूप सांगण्याची आणि आशय प्रभावीपणे मांडण्याची ताकद लघुपटांमध्ये असते, त्यामुळे आपल्यालाही एखाद्या लघुपटात काम करण्याची संधी मिळावी असे कायम वाटत होते. ‘क्वॉर्टर’द्वारे ही इच्छा पूर्ण झाल्याची भावना गिरिजाने व्यक्त केली. आजवर बऱ्याच माध्यमांतून वेगवगेळ्या धाटणीच्या भूमिका साकारण्यास मिळाल्या असल्या तरी ‘क्वॉर्टर’मधली भूमिका अभिनेत्री म्हणून समाधान देणारी असल्याचेही तिने सांगितले.

गिरिजासारख्या अभिनेत्रीने ‘क्वॉर्टर’मध्ये भूमिका साकारणे हेच या लघुपटाचे वेगळेपण आणि यश असल्याचे मत दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर याने व्यक्त केले.