भारतीय सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाव्दारे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री नूतनचे डूडल बनवत गुगलने तिला अनोखा मान दिला आहे. दिवंगत अभिनेत्री नूतनचा आज (४ जून) ८१ वा जन्मदिवस असल्याच्या निमित्ताने हे डूडल बनविण्यात आले आहे. या अभिनेत्रीने मोठा पडदा गाजवत आपल्या कारकिर्दीत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ६ वेळा फिल्म फेअर अॅवॉर्ड मिळविले आहे. मिस इंडिया हा सन्मानही तिला मिळाला होता.
नूतनचा जन्म ४ जून १९३६ मध्ये झाला. शालेय जीवनापासून तिने आपल्या चित्रपटातील कारकिर्दीला सुरुवात केली. प्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्माती शोभना समर्थ यांची ती मुलगी होती. नूतनने जवळपास ७० भारतीय चित्रपटांमध्ये काम केले आहे. सीमा या चित्रपटासाठी तिला पहिला फिल्म फेअर अॅवॉर्ड मिळाला. याशिवाय सुजाता, बंदिनी, मिलन, मै तुलसी तेरे आंगन की, मेरी जंग अशा चित्रपटांतून आपली वेगळी छाप पाडली. या सगळ्या चित्रपटांसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळाला होता.
चार दशके चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या या अभिनेत्रीला १९८९ मध्ये कॅन्सर झाला. १९९१ मध्ये या आजाराशी सामना करताना नूतनने जगाचा निरोप घेतला होता. मात्र मृत्यूनंतरही तिचे चाहत्यांच्या मनातील स्थान आजही तितकेच अढळ आहे. आज गूगलने तिच्या कार्याची दखल घेत भारतीय सिनेसृष्टीचाही गौरव केला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 4, 2017 12:12 pm