मिर्झा असद-उल्लाह बेग ख़ां उर्फ ‘गालिब’ हे एक प्रसिद्ध फारसी आणि उर्दू कवी होते. ते सुधारक वृत्तीचे, सर्व धर्मांना समान मानणारे, कर्मठ नसलेले, नमाजाचे पठन न करणारे, रोजा न ठेवणारे, कलेचे आसक्त, रसिक व्यक्ती होते. गालिब केवळ चार वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर आजोबा आणि काकांनी त्यांचे पालनपोषण केले. लहानपणी त्यांनी इस्लामचे धडे घेतले, फारसी भाषा शिकली.

शब्दांवर प्रभुत्त्व असणाऱ्या गालिब यांचे पेशव्यांशीही नाते जोडले गेले. मिर्झा गालिब हे थोरल्या बाजीरावांची पत्नी मस्तानी हिच्या वंशात जन्माला आले होते. गालिब यांनी फारसी भाषेत लिखाण काम सुरू केले. त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून त्यांनी नेहमीच जीवनाचे गंभीर तत्वज्ञान मांडले. जीवनाच्या झळा सोसून मिर्झा गालिब यांनी त्या अधिक सुंदर करून काव्याच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडल्या. वयाच्या ११व्या वर्षापासून ते शेर लिहीत होते. त्यांनी फारसी भाषेत जवळपास १८,००० हून जास्त शेर रचले. पुढे मित्रांच्या आग्रहाखातर त्यातीलच १०००-१२०० शेर त्यांनी उर्दू भाषेत लिहिले.

गालिब यांनी कधीच कोणताही उद्योगधंदा केला नाही. मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या मदतीने राहणाऱ्या गालिब यांना कधीच प्रसिद्धी मिळविण्याची गरज वाटली नाही. उत्तर मुघल काळातील राजांच्या, उमरावांच्या दरबारी जाण्याकडेही त्यांचा कल नव्हता. ‘माझ्या कविता माझ्या मृत्यूनंतरही अजरामर राहणार असल्याने माझे नाव आपोआपच सर्वत्र पसरणार’, असेच ते कायम म्हणत. गालिबच्या काव्यावर मीर आणि आमीर खुसरो यांच्या रचनांचा प्रभाव होता. साहित्य निर्मिती करताना केवळ चौकट मोडून चालत नाही. त्यात तितकी ताकदही असावी लागते. गालिब यांनी परंपरेला नाविन्याची झालर लावली. अभिजात सौंदर्याची बूज राखायला शिकवले. घराण्यातच सैनिकी पार्श्वभूमी असल्याने गालिब यांच्या लेखणीत बंडखोरीचे बीज होते. मिर्झा गालिब यांच्यावर हिंदीत १९५४ साली एक चित्रपट साकारण्यात आला होता. १९८८ मध्येही त्यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा चित्रपट साकारण्यात आला होता. पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शक सोहराब मोदी तर गुलजार यांनी दुसऱ्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

गालिब यांच्या जयंतीनिमित्त गुगल डूडलचाही अनोखा अंदाज
मावळतीचा सूर्य, मशिद आणि गालिब असे सुंदर चित्र रेखाटत आजचे गुगल डूडल साकारण्यात आले आहे. या डूडलच्या मध्यभागी हातात लेखणी आणि कागद घेतलेल्या गालिब यांचे चित्र साकारण्यात आले असून, ते शब्दांची गुंफण करण्यात रमल्याचे पाहायला मिळत आहे.

मिर्झा गालिब यांच्या काव्यातील काही प्रसिद्ध ओळी
काबां किस नूर से जाओगे गालिब, शर्म तुमको मगर नहीं आती
दिल-ए-नादाँ तुझे हुआँ क्या आखि़र इस दर्द की दवा क्या है
नुक्ताचीं है ग़म-ए-दिल उस को सुनाये न बने
ये नथी हमारी किस्मत कि विसाल-ए-यार होता
हजारो ख्वाईशें ऐसी के हर ख्वाईश पे दम निकलें
हैं और भी दुनियामें सुखन-वर बहुत अच्छे,
कहते हैं कि गालिब का अंदाज-ए-बयाँ और