दंगली किंवा जातीय वादाच्या इतिहासावर आधारलेल्या चित्रपटांना आपल्याकडे वादाच्या अडथळ्यांतून वाट काढावी लागते. पण एकूणच वादाचा लागलेला बट्टा या चित्रपटांना सर्वसाधारण प्रेक्षकवर्ग मिळवून देत नाही. १९८४ च्या शीखविरोधी दंगलीतील एका घटनेवर बेतून २००५ साली आलेल्या ‘आमू’ या चित्रपटाच्या चित्रीकरणापासून ते प्रदर्शनापर्यंत नवा चित्रपट बनविता येईल इतक्या लक्षवेधी घटना घडल्या. सेन्सॉरबोर्डाच्या कात्रीकरणाच्या हौसेमधून त्याची बऱ्यापैकी दृश्य मोडतोड झाली. चित्रपट  प्रौढांसाठीचे प्रमाणपत्र घेऊन टीकेसह मर्यादित दर्शकांचा धनी झाला. महेश भट यांचा जख्म किंवा अपर्णा सेन यांच्या मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस अय्यर या दंगल-हिंसाचाराच्या इतिहासातील वैयक्तिक घटनांवरच्या कथानकांनाही विविध कारणांमुळे ब्लॉकबस्टर सिनेमांच्या चतुर्थाशही प्रेक्षक मिळवू शकला नाही. एरवी कारण नसताना चित्रपटातील इतिहासाच्या गल्लतीबाबत आक्षेप-आंदोलन करणारे अजाणकार समाजघटक दंगल-िहसेच्या इतिहासाला जसेच्या तसे चित्रित केल्यास होऊ शकणाऱ्या सामाजिक दुखापतीचा बाऊ करू लागतात. अमेरिकी व्यावसायिक आणि इंडिपेण्डण्ट चित्रप्रवाहाला अशा प्रकारचे चित्रपट करताना वादाचा सामना करावा लागत नाही. दंगली किंवा वंशविद्वेशाच्या घटनांचे प्रक्षोभक फुटेज वापरून तयार केलेल्या माहितीपटांची, चित्रपटांची संख्या अगणीत आहे. विद्वेषाच्या इतिहासाचा सूक्ष्मैतिहास मांडताना आत्ताच्या सन्मानीय व्यक्ती, समाज घटक यांच्या दुखापतीच्या विचारांऐवजी तथ्थ्यांच्या मांडणीला महत्त्व दिले जाते. अमेरिकेतील लॉस एंजेलिस परिसरात घडलेल्या एका कुप्रसिद्ध दंगलीच्या सूक्ष्मैतिहासात घडणाऱ्या व्यक्तिसमूहाची गोष्ट सांगणारा ‘गूक’ हा चित्रपट याकडे त्याचे चांगले उदाहरण म्हणून पाहता येईल.

‘गूक’ ही अमेरिकेतील कोरियन नागरिकांसाठी वापरली जाणारी शिवी असल्याच्या माहितीपासून चित्रपट एप्रिल १९९२ च्या एका दिवसाच्या निश्चित तारखेपासून सुरू होतो. या दिवशी घडलेल्या घटनांचे डोळ्यांना त्रासदायक ठरणारे तपशील किंवा उग्र दृश्यांचा मागोवा घेण्यात या चित्रपटाचा मुख्य अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक जस्टिन चॉन याला रस नाही. त्यामुळे बाधित झालेल्या दुसऱ्याच नाटय़पूर्ण घटनेला चित्रपटात महत्त्व आहे.  चित्रपट घडतो लॉस एंजेलिसमधील कृष्णवंशीयबहुल वस्तीभोवती राहत असलेल्या दोन कोरियन भावांकडे वारशाने आलेल्या बूट दुकानाजवळ.  इलाय (जस्टिन चॉन) आणि डॅनियल (डेव्हिड सो) यांचा फारसा बरा न चाललेला व्यवसाय त्यांच्या आनंदात बाधा आणत नाही. कॅमिला (सिमोन बेकर) नावाची जवळच राहणारी एक शाळकरी कृष्णवंशीय मुलगी आपली शाळा बुडवून या दुकानात स्वेच्छेने काम करीत असते. या आशियाई वंशाच्या भावांसोबत आफ्रिकी वंशीय लहानगी कुटुंब असल्यासारखे वावरत असते. चित्रपट सुरू होतो त्या दिवशी या प्रत्येकाच्या टीव्हीवर रॉडनी किंग दंगलीच्या वृत्ताचे तपशील सुरू झालेले असतात. रॉडनी किंग या कृष्णवंशीय वाहनचालकाला चार गोऱ्या पोलिसांनी १९९१ साली कारणाशिवाय ठार केले होते. या घटनेचे चित्रीकरण एका व्यक्तीमुळे वृत्तमाध्यमांच्या कार्यालयात पोहोचले आणि चारही पोलिसांना अटक करण्यात आली. एप्रिल १९९२मध्ये या चारही पोलिसांना दोषी न ठरविता मुक्त करण्यात आले. त्यामुळे कृष्णवंशीयांसोबत इतर समाजानेही शहरात जाळपोळ आणि लुटीचे मोठे सत्र चालविले. त्यात ५० हून अधिक ठार झाले आणि शेकडो लोक जखमी झाले. दंगलखोरांच्या भेदभावरहित कृत्यांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फेऱ्यात ‘गूक’ चित्रपटातील साऱ्या व्यक्ती येतात.

आई-वडिलांचा मृत्यू झालेल्या घरात मोठय़ा बहीण-भावाच्या छत्राखाली राहणारी कॅमिला कोरियन भावांच्या दुकानातील मुख्य सदस्येसारखी राहत असते. तेथे फावल्या वेळेत हिप- पॉप गाण्यांवर नृत्य आणि दुकानामध्ये येणाऱ्या सर्व कृष्णवंशीय ग्राहकांना मदत या भूमिका लीलया वठवताना तिचे कोरियन भावांशी भांडण होते, क्रूर शाब्दिक दंगा होतो तरीही त्या तिघांची गट्टी न मोडणारी असते.

दंगलीला सुरुवात होते, तेव्हा या तिघांचा दिवस नेहमीप्रमाणे सुरू झालेला असतो. दुकानात ग्राहक येत-जात असतात. दुकानाच्या काचेमधून बाहेर पोलिसांच्या गाडय़ा हिंसाचाराच्या ठिकाणी निघालेल्या दिसतात. दुकानाच्या बाहेरून आकाशात विविध भागांतून धुराचे लोट निघत असताना यांचे दैनंदिन व्यवहार नेहमीसारखेच चाललेले पाहायला मिळतात. दोघा भावांमध्ये नेहमीसारखीच भांडणे होतात. त्यांच्या समोरच्या आणखी एका कोरियन दुकानमालकाशी हे दोघे नेहमीचीच हुज्जत घालतात. दुपापर्यंत त्यांची गाडी घाणेरडय़ा संदेशांनी माखली जाते आणि संध्याकाळी दंगलनाटय़ाच्या फेऱ्यात या दोघांच्या दुकानासह कॅमिलाही सहजपणे येते.

दंगलीचा क्रूर तपशील चित्रपटात टीव्हीवरच्या वृत्तांकनातून येतो. पण त्याहून अधिक परिणामकारक येथे घडविण्यात आलेल्या घटना आहेत. संपूर्ण चित्रपटाच्या ब्लॅक-अ‍ॅण्ड व्हाईट चित्रीकरणामुळे चित्रपटाला उचित सौंदर्य  प्राप्त झाले आहे. स्पाईक ली याच्या ‘डू द राइट थिंग’ या अमेरिकी वंशविद्वेशाचा एक दिवस दाखविणाऱ्या चित्रपटाशी ‘गूक’ची तुलना करता येईल. येथे कोणत्याही समाजाला भले-बुरे ठरविण्याचा प्रयत्न नाही. वंशविद्वेशाच्या सूक्ष्म-इतिहासाची ही मांडणी अशा विषयाच्या चित्रपटाला कायमच अडथळे असणाऱ्या आपल्या देशातील चित्रकर्ते आणि चित्रदर्शकांनी आवर्जून अनुभववावी अशी आहे.