अ‍ॅनिमेशन, ग्राफिक्स, स्पेशल इफेक्ट्स याचा मोह मला खूप आधीपासून आहे. परंतु, आपल्याकडे या माध्यमासाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान विकसित झालेले नव्हते. परंतु, आता उत्तमोत्तम तंत्रज्ञानाचे पाठबळ मिळाले आणि त्याचबरोबर अ‍ॅनिमेशन माध्यमाद्वारे गोष्ट सांगण्याचे आकर्षण मला बऱ्याच काळापासून होते. म्हणूनच बऱ्याच काळापासून घोळत असलेली गोष्ट सांगणारा ‘कमलू हॅपी हॅपी’ या अ‍ॅनिमेशनपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. ‘दिल्ली सफारी’ ज्यांनी बनविला त्या पुण्याच्या ‘क्रेयॉन पिक्चर्स’चे उत्तम तंत्रसहकार्य मला मिळाले, असे ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले.
‘कमलू’ हे उंटाचे पिल्लू आहे. त्या पिल्लाला हवेत उंच भरारी घ्यायची आहे. ते त्याचे स्वप्न आहे. उंट उडू शकत नाही, असे त्याला सगळेजण सांगतात. पण ही अशक्य गोष्ट त्याला साध्य करून दाखवायची आहे. या कल्पनेभोवती ‘कमूल हॅपी हॅपी’ हा अ‍ॅनिमेशनपट केला आहे. अ‍ॅनिमेशन म्हटले की बच्चेकंपनीसाठी असणार असे आपल्याकडे गृहित धरले जाते. याबद्दल विचारले असता निहलानी म्हणाले की, आता काळ बदललाय. ‘कमलू.’ लहान मुलांसाठी तर आहेच; पण खरे तर ५ ते ५० वयोगटातील प्रेक्षकांसाठी आपण ‘कमलू..’ बनविलाय.
अ‍ॅनिमेशनपट म्हणजे तंत्रज्ञानावरच सगळा भर द्यावा लागतो. त्यामध्ये मग कथावस्तु, कलात्मकता मागे पडते असे वाटते का याबद्दल निहलानी म्हणाले की, अ‍ॅनिमेशनपट बनवायचा तर निश्चितपणे उत्तम दर्जाचे तंत्रज्ञान हवे. ते चांगल्या प्रकारे कसे वापरायचे याचा विचारही गांभीर्याने करावा लागतो. हे तंत्रज्ञान खूप महागडेसुद्धा आहे. परंतु शेवटी कथनशैली आणि काय सांगायचेय हा भाग कधीच लोप पावणार नाही. कारण संगणकावर अ‍ॅनिमेशन करणारी माणसेच असतात. त्यामुळे चित्रपटापेक्षा अ‍ॅनिमेशनपटांचा फॉरमॅट वेगळा असला तरी त्यात मानवी भावभावना, मानवी स्पर्श महत्त्वाचाच राहणार.आपल्याकडे अ‍ॅनिमेशनपटांना प्रेक्षक फारसे गांभीर्याने घेत नाहीत याबाबत त्यांनी सांगितले की, वॉल्ट डिस्नेने पाश्चात्य जगतात जेव्हा पहिल्यांदा अ‍ॅनिमेशन आणले तेव्हाही असाच विचार प्रेक्षकांनी केला होता. हे लहान मुलांसाठीच बनविले जातात, असा समज पसरला होता. परंतु, तंत्रज्ञानाने केलेली अफाट प्रगती आणि बदलता काळ लक्षात घेतला तर लहान मुलांबरोबरच सर्वसामान्य प्रौढ प्रेक्षकालाही अ‍ॅनिमेशनपटांचा फॉरमॅट नक्कीच भुरळ घालेल, असा विश्वास निहलानी यांनी व्यक्त केला. तंत्रज्ञान आणि कथनशैली व उत्तम पटकथा यांचा अनोखा मिलाफ अ‍ॅनिमेशनपटातून दिसायला हवा.
‘कमलू हॅपी हॅपी’चे निर्मित्तोतर काम सध्या जोरात सुरू असून येत्या वर्षअखेर अ‍ॅनिमेशनपट प्रदर्शित केला जाणार आहे. शुक्रवारी प्रदर्शित होत असलेल्या ‘अनुमती’बद्दल विचारले असता ते म्हणाले की, त्याची गोष्ट आणि गजेंद्र अहिरे यांची पटकथेवरची पकड यामुळे या चित्रपटाचे छायालेखन करायला मला खूप आवडले. स्वत: एक दिग्दर्शक असलो तरी जेव्हा आपण छायालेखक म्हणून जबाबदारी स्वीकारतो तेव्हा दिग्दर्शक ज्या दृष्टीने चित्रपटाकडे पाहतो त्याबरहुकूम चित्रीकरण करण्याकडे भर दिला. त्यामुळे चित्रपट करायला मजा आली, असेही निहलानी यांनी आवर्जून सांगितले.