मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाहिन्यांवरील मराठी मालिकांच्या चित्रीकरणाच्या वेळे संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्याचे ठरविले आहे. तसेच राज्यातील वृद्ध कलावंतांच्या थकित निवृत्तिवेतनाचा प्रश्नही मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी शुक्रवारी दादर येथे एका पत्रकार परिषदेत दिली.
मालिकांच्या चित्रीकरणा संदर्भात कोणतेही वेळापत्रक सध्या नाही. सकाळपासून सुरू झालेले चित्रीकरण रात्री उशिरापर्यंत चालते. यातून कलाकार व तंत्रज्ञांची होणारी धावपळ, याचा त्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम हे विचारात घेऊन काही मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्याचे ठरविण्यात आल्याचे पाटकर म्हणाले.
वृद्ध कलाकारांना राज्य शासनाकडून निवृत्तिवेतन दिले जाते. गेल्या काही वर्षांपासून ही रक्कम प्रलंबित असून निवृत्तिवेतनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महामंडळ प्रयत्न करणार आहे. महामंडळाकडून वृद्ध कलाकारांसाठी निवृत्तिवेतन योजना सुरू करण्यासाठीही विचार सुरू असल्याचे पाटकर यांनी सांगितले.
नाशिक येथे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची शाखा सुरू करणे, कोल्हापूर येथील चित्रनगरी, चित्रपट वितरण व्यवस्था, मराठी चित्रपटांसाठी चित्रपटगृह उपलब्ध करून देणे, निर्माते, कलाकार, तंत्रज्ञ आदींसाठी कार्यशाळा आयोजित करणे हेही महामंडळाकडून केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.