आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत राहणारा स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल खान ‘गल्ली बॉय’ या चित्रपटामुळे पुन्हा एकदा चर्चेत आहे. रणवीर सिंगने आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर गाजवलेला हा सुपरहिट चित्रपट यंदाच्या ऑस्कर पुरस्कार नामांकनासाठी भारताकडून पाठवण्यात आला आहे. या चित्रपटावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव केला गेला. परंतु कमाल खान या निर्णयावर खुश नाही. त्याने ट्विटरच्या माध्यमातून या चित्रपटाबाबत पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे.

‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फिचर फिल्म’ या पुरस्कारासाठी गल्ली बॉयला पाठवण्यात आले आहे. परंतु कमाल खानच्या मते हा चित्रपट ऑस्करच्या दर्जाचा नाही. “गल्ली बॉय एक चांगला चित्रपट आहे, मात्र ऑस्कर मिळवू शकेल या दर्जाचा तो नक्कीच नाही. या चित्रपटाची निर्मिती एका इंग्रजी चित्रपटाला कॉपी करुन करण्यात आली होती. त्यामुळे आपली ऑस्कर जिंकण्याची शक्यता धुसरच आहे. शिवाय आपल्याकडे फिल्म फेअर सारखे नामांकित पुरस्कार असताना आपल्याला ऑस्करची काय गरज?” अशा शब्दात कमाल खानने टीका केली आहे.

चित्रपट समीक्षक व प्रेक्षकांकडून दाद मिळवणारा रणवीर सिंग व आलिया भट्टचा ‘गली बॉय’ हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत उतरला आहे. प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ‘ऑस्कर’ पुरस्कारासाठी भारताकडून ‘गली बॉय’ची निवड करण्यात आली आहे. झोया अख्तर दिग्दर्शित ‘गली बॉय’ या चित्रपटात झोपडपट्टीत लहानाचा मोठा झालेला आणि आपल्या स्वप्नांसाठी धडपडणाऱ्या २६ वर्षीय डिव्हाइन या प्रसिद्ध रॅपरची कथा दाखवण्यात आली आहे.

मुंबईच्या चाळ संस्कृतीतून रॅपर्सच्या दुनियेत नावलौकिक मिळवणाऱ्या ‘डिव्हाइन’ म्हणजे विवियन फर्नांडिस आणि ‘रॅपर नॅझी’ म्हणजेच नावेद शेख यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांपासून ‘गली बॉय’च्या कथानकासाठी प्रेरणा घेण्यात आली आहे. चित्रपटातील रणवीर व आलियाच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.