तेजस्वी, लखलखत्या, पल्लेदार स्वरांचे स्वामी असणाऱ्या मा. दीनानाथ यांना केवळ ४२ वर्षांचं आयुष्य लाभलं. त्यांची जागा अन्य कोणी घेणं अशक्यच. तरीही इतिहासाची पुनरावृत्ती व्हावी, त्याप्रमाणे स्वराधीश भरत बलवल्ली मा. दीनानाथांचं गाणं घेऊनच जन्माला आला. केवळ आवाजच नाही तर दीनानाथांच्या व त्याच्या चेहऱ्यातील साम्यही अचंबित करणारं आहे. दीनानाथांचा हा जणू गुणर्जन्मच! दीनानाथांनी गायलेली अनेक नाटय़गीतं ‘दिव्य संगीत रवी’ या नव्या अल्बममध्ये भरतच्या आवाजात ऐकण्यास मिळतात. यानिमित्त ‘लोकसत्ता’शी त्याने खास संवाद साधला.
माझे बाबा तबलावादक असल्याने घरात गाण्याचं वातावरण होतंच. साधारण नववी-दहावीत असताना मी पं. यशवंतबुवा जोशी यांच्याकडे गाणं शिकू लागलो. त्या सुमारास बालगंधर्वासह अनेक थोरामोठय़ा गायकांची गाणी मी ऐकत होतो, मात्र दीनानाथांची गाणी ऐकली आणि आतूनच असं जाणवलं की हे तर मी गाऊ शकतो. त्यानंतर त्यांच्या गाण्यांची पारायणं केली, मात्र ती घोटावी लागली नाहीत. माझ्या गळ्यातून तसं गाणं येण्यासाठी वेगळे परिश्रम करावे लागले नाहीत. माझ्या आवाजातील दीनानाथांची गाणी श्रीनिवास खळे, यशवंत देव यांच्यासारख्या संगीतकारांनी ऐकली, त्यांनी दीनानाथांचं गाणं प्रत्यक्ष ऐकलेलं. हा मुलगा हुबेहूब तसंच गातोय, ही त्यांची प्रतिक्रिया माझा उत्साह वाढवणारी ठरली. त्यानंतर माझ्या पाठीवर कौतुकाची थाप पडली ती गणपतराव मोहिते ऊर्फ मा. अविनाश यांच्याकडून. मोहिते हे तर दीनानाथांचे स्नेही व सहकारी. त्यांनी मला ‘युवतीमना व शूरा मी वंदिले’ ही पदे गाण्यास सांगितली. डोळे मिटून ते ती गाणी ऐकत होते. माझं गाणं संपल्यावर ते म्हणाले, हे तर तेच गाणं आहे. दीनानाथांच्या सहकाऱ्याकडून शाबासकी मिळण्याचा तो आनंद वेगळाच होता. पुढे दीनानाथांचं गाणं मी जाहीर कार्यक्रमांतून गाऊ लागलो, मात्र त्यांचं गाणं मी ठरवून कधीच गायलो नाही, किंबहुना गाऊ शकत नाही. बठक मारली की मला ते सूर दिसतात आणि मी गातो, इतकंच. या प्रवासात मला मोलाचं मार्गदर्शन लाभलं ते यशवंतबुवांचं. बुवांकडे माझं गाणं समृद्ध झालं, ‘माझी गायकी अनुसरू नकोस, तू तुझ्या शैलीत गा’ हा त्यांचा उपदेश मी शिरोधार्य मानत आलो. कार्यक्रमात मी दीनानाथांची गाणी मनसोक्त गातो, तरीही हे कायमचं संग्रही असावं, दीनानाथांच्या चाहत्यांसाठी ते कधीही उपलब्ध व्हावं, असं वाटल्याने ‘दिव्य संगीत रवी’ या अल्बमचा घाट मी घातला. ‘युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप’मुळे त्याला मूर्त रूप आलं. या अल्बमच्या दोन सीडीमध्ये मी दीनानाथांची १६ गाणी गायलोय. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, आशा खाडिलकर, डॉ. विद्याधर ओक, शरद पोंक्षे, मंदार गुप्ते यांच्या उपस्थितीत हा अल्बम प्रकाशित झाला.
या अल्बमचं सगळ्यांनी स्वागत केलं आहे. मा. दीनानाथांचा वारसा समर्थपणे पुढे नेणाऱ्या मंगेशकर भावंडांनीही माझं वेळोवेळी कौतुक केलं आहे.
केवळ या अल्बमलाच नाही, तर माझ्या कारकीर्दीला मंगेशकर परिवाराचा आशीर्वाद लाभला आहे. दीनानाथांच्या गायकीला उजाळा दिल्याबद्दल, त्यांच्या गायकीचं पुनरुज्जीवन केल्याबद्दल समस्त मंगेशकरांनी माझे आभार मानल्येत. ही प्रशंसा सुखावणारी आहे. लतादीदींसह सर्व मंगेशकरांनी माझं गाणं अनेकदा प्रत्यक्ष ऐकलं आहे. मंगेशकर आणि माझ्यातलं आणखी एक साम्यस्थळ म्हणजे सावरकरभक्ती. दुर्दैवाने, माझ्या पिढीला सावरकरांचं मोठेपण ठाऊक नाही, त्यामुळे त्यांच्या कवितांचा स्वतंत्र अल्बम यायला हवा, असं वाटलं आणि सावरकरांच्या ५० कविता मी स्वरबद्ध केल्या. त्यातली निवडक गीतं आता मराठीत ‘स्वतंत्रते भगवती’ आणि िहदीत ‘हमही हमारे वाली है’ या अल्बमच्या माध्यमातून लवकरच येतायत.
यासाठी मराठीत शरद पोंक्षे यांनी तर िहदीत बिग बी अमिताभ बच्चन यांनी निवेदन केलं आहे. दीनानाथांचं गाणं पुढे नेताना मला माझ्यातला संगीतकारही गवसलाय. रसिकांची सेवा करण्यासाठी एका कलाकाराला आणखी काय हवं?