गुरुदत्त यांच्या आत्मचरित्रावर भावना तलवार चित्रपट बनवत असून, या चित्रपटातील काही भागांवर गुरुदत्त यांची भाची कल्पना लाजमी हिने आक्षेप दर्शविला आहे.  
कल्पना म्हणाली, गुरुदत्त यांच्या आत्मचरित्रावर बनवण्यात आलेल्या कोणत्याही चित्रपटात गुरुदत्त आणि वहिदा रेहमान यांच्यातील संबंधानाच जास्त महत्व दिले जाते, असे मला नेहमीच वाटत आले आहे. प्रत्येकाला असेच वाटते की, गुरुदत्त यांनी वहिदा रेहमानमुळे आत्महत्या केली. परंतु, हे असत्य आहे. १९५८ मध्येच गुरुदत्त आणि वहिदा एकमेकांपासून दूर गेले होते. गुरुदत्त यांनी १९६४ मध्ये आत्महत्या केली.  जर भावना तलवार यांनी गुरुदत्त आणि वहिदा यांच्यातील नातेसंबंधाचे चुकीचे चित्रिकरण केले, तर माझा मामे भाऊ तरूणदत्त (गुरुदत्त यांचा मुलगा) कायदेशीर कारवाई करेल.
गुरुदत्त यांच्या आत्मचरित्रावर आधारीत भावना तलवारच्या चित्रपटावर आपण कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नसल्याचे कल्पना म्हणाली. या चित्रपटाच्या संदर्भात भावना आणि कल्पना एकमेकींना भेटणार आहेत. या चित्रपटासाठी एक सल्लागार म्हणून कल्पनाने काम पाहावे, अशी भावनाची इच्छा आहे. परंतु, पुजा भट निर्मित भुपेन हजारिका यांच्या आत्मचरित्रावर बनत असलेल्या चित्रपटात कल्पना सध्या व्यस्त आहे. शिवाय, गुरु दत्त यांच्या आत्मचरित्रावर तयार होत असलेल्या आणखी एका चित्रपटासाठी शिवेंद्र सिंग डुंगरपुर यांनी सखोल संशोधन केले आहे. यावर त्यांनी १४ वर्षे काम केले आहे. त्यामुळे शिवेंद्र यांना गुरुदत्तवर चित्रपट बनविण्याचा नैतिक अधिकार पोहोचत असल्याचे कल्पनाला वाटते.
याबाबत बोलताना निर्माता शितल तलवार म्हणाले, भावनाचा चित्रपट हा आत्महत्येविषयी नसल्याने गरुदत्त यांच्या मृत्यूच्या कारणाचे भांडवल करण्याचा प्रश्नच येत नाही. तिने गुरुदत्त यांच्या जीवनावर व्यापक संशोधन केले असून, त्यांच्या जवळच्या अनेक व्यक्तींची भेट घेतली आहे. भावनाला कल्पना आणि तरूणला भेटायला नक्कीच आवडेल.