नागराज मंजुळे यांच्या सैराट या चित्रपटातून मराठी कलाविश्वात पदार्पण करणारी आर्ची अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरू हे नाव कोणालाही नवीन राहिलेलं नाही. कमी वयात रुपेरी पडद्यावर पाऊल ठेवणारी ही अभिनेत्री आता वेबविश्वातही झळकू लागली आहे. त्यामुळे रिंकूची चर्चा गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत होत असल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कमी वयात नाव, प्रसिद्धी मिळविलेल्या रिंकूला खरं तर अभिनयाव्यतिरिक्त अन्य एका क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती. एका मुलाखतीत बोलत असताना तिने तिच्या मनातील इच्छा व्यक्त केली.
‘सैराट’, ‘कागर’, ‘मेकअप’ या चित्रपटात झळकलेल्या रिंकूचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे तिच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यातच तिच्याशी निगडीत काही गोष्टींची चर्चाही चाहत्यांमध्ये रंगली आहे. त्यातलीच एक म्हणजे तिच्या करिअरविषयी असलेल्या स्वप्नांची. यात काही दिवसांपूर्वी रिंकूने अभिनय क्षेत्रात नसते तर कोणत्या क्षेत्राला प्राधान्य दिलं असतं हे सांगितलं होतं.
रिंकूला अभिनेत्री होण्यापूर्वी डॉक्टर व्हायचं होतं.जर या क्षेत्रात आले नसते तर मी नक्कीच डॉक्टर झाले असते, असं रिंकूने सांगितलं. त्यामुळे अभिनय क्षेत्रात उत्तुंग यश मिळविणाऱ्या या अभिनेत्रीचं डॉक्टर होण्याचं स्वप्न आहे. सध्या रिंकू करिअरसोबतच तिचं शिक्षणही पूर्ण करत आहे. व्यस्त कामकाजातून वेळ काढत ती अभ्यास करत असते.
दरम्यान, सध्या लॉकडाउन असल्यामुळे रिंकू तिच्या घरी आहे. या काळात ती तिच्या आई-वडिलांसोबत वेळ घालवतेय. घरातील कामं, चित्र काढणे, वेब सीरिज पाहणे यात ती स्वत:ला गुंतवून ठेवतेय. मात्र तिला तिच्या अभ्यासाची फार चिंता सतावतेय.