‘स्कॅम १९९२ : द हर्षद मेहता स्टोरी’ ही वेब सीरिज IMDb वर पहिल्या क्रमांकावर असल्याचं वृत्त एका वेबसाइटने दिलं. त्यावर ही माहिती खोटी असल्याचं ट्विट वेब सीरिजचे दिग्दर्शक हंसल मेहता यांनी केलं. वेब सीरिज पहिल्या नाही तर एकविसाव्या क्रमांकावर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

‘हे खरं नाहीये. आमची वेब सीरिज एकविसाव्या क्रमांकावर आहे. या बातमीच्या आकडेवारीत चूक आहे’ असं त्यांनी लिहिलं. स्कॅम १९९२ या वेब सीरिजला IMDb वर ९.० रेटिंग असून ती टॉप २५० शोच्या यादीत २१व्या स्थानी आहे.

आणखी वाचा : Mirzapur 2 : दुसऱ्या सिझनसाठी पाच पटीने जास्त पैसे झाले खर्च; जाणून घ्या किती आहे बजेट?

बीबीसीची प्लॅनेट अर्थ 2 ही पहिल्या क्रमांकावर असून त्यानंतर प्लॅनेट अर्थची बँड ऑफ ब्रदर्स, ब्रेकिंग बॅड, चर्नोबिल आणि द वायर हे शो आहेत. विसाव्या क्रमांकावर बेनेडिक्ट कंबरबॅचचा शेरलॉक आहे. द ट्वायलाइट झोन २२व्या स्थानी आहे.

सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘स्कॅम १९९२ : द हर्षद मेहता स्टोरी’ ही सीरिज प्रदर्शित झाली आहे. १९९२ मध्ये हर्षद मेहता याने बँकांच्या पदाधिकाऱ्यांशी संगनमत करून आणि भांडवल बाजारातील दलालांना हाताशी धरून देशाच्या अर्थव्यवस्थेला हादरवून टाकणारा ७०० कोटी रुपयांचा शेअर बाजार घोटाळा केला होता. त्यावरच या सीरिजचं कथानक आधारित आहे.