एका चॉकलेटच्या जाहिरातीतून करिअरची सुरुवात करणाऱ्या अभिनेत्री दिशा पटानीचा आज वाढदिवस. अत्यंत कमी वेळात दिशाने बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. ‘एम.एस.धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून तिने पदार्पण केलं. या चित्रपटानंतर दिशाच्या करिअरला कलाटणी मिळाली आणि पाहता पाहता ती एक यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाऊ लागली. विशेष म्हणजे यश आणि लोकप्रियता मिळवणाऱ्या या अभिनेत्रीला सुरुवातीच्या काळात प्रचंड स्ट्रगल करावा लागला होता. दिशाने तिच्या करिअरची सुरुवात केवळ ५०० रुपयांमध्ये केली होती. एका मुलाखतीमध्ये तिने त्याच्या करिअरविषयीचे काही अनुभव शेअर केले आहेत.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या या प्रवासाबद्दल सांगितले. करिअरच्या सुरुवातीलाच निराशा तिच्या पदरात कशाप्रकारे पडली, मुंबईत आल्यानंतर काम मिळवण्यासाठी तिने धडपड कशी केली, हे सर्व तिने सांगितले. ‘एका चित्रपटात भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली. पण ऐनवेळी माझ्याऐवजी दुसऱ्याच अभिनेत्रीला त्यात घेण्यात आलं. तो माझ्या पहिलाच चित्रपट होता. पण प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही कारण असतं. नकार तुम्हाला अधिक खंबीर बनवतो हे मला सुरुवातीलाच शिकायला मिळालं. ज्या कारणासाठी तुम्हाला नकार मिळतो, तेव्हा त्यासाठी तुम्ही अधिक मेहनत घेता,’ असं ती म्हणाली.

अभिनेत्री होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिशाने अर्ध्यावरच शिक्षण सोडल्याचं स्पष्ट केलं. “शिक्षण अर्धवट सोडून मी मुंबईला आली. कोणत्याही ओळखीशिवाय एका नवीन शहरात येऊन राहणं काही सोपी गोष्ट नाही. मी एकटीच राहत होती आणि स्वत:च्या खर्चासाठी कधीच कुटुंबीयांकडे पैसे मागितले नाही. फक्त ५०० रुपये घेऊन मी मुंबईत आली होती आणि एक वेळ अशी आली की जेव्हा माझ्याकडे अजिबात पैसे नव्हते. जाहिराती आणि चित्रपटांच्या ऑडिशन्ससाठी मी खूप फिरले. काम मिळालं नाही तर घरभाडं कसं देऊ याचा सतत ताण माझ्यावर होता,”असं तिने सांगितलं.

दिशाने २०१७ मध्ये मुंबईतील बांद्रा येथे एक घर घेतलं असून तिच्या घराचं नाव ‘लिटील हट’ असं आहे. या घराची किंमत जवळपास ५ कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या ‘एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून दिशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटासाठी तिला वाहवा मिळाली. टायगरसोबत तिच्या रिलेशनशिपचीही बरीच चर्चा रंगली. त्यातच आता युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि दिशाच्या मैत्रीचीदेखील चर्चा रंगत आहे.