‘फितूर’ चित्रपटानंतर चर्चेतून आणि बी टाउनपासून काही काळ दूर असलेल्या अभिनेत्री कतरिना कैफ हिचा आज वाढदिवस आहे. ‘नमस्ते लंडन’, ‘अजब प्रेम की गजब कहानी’, ‘जब तक है जान’ आणि अशा अनेक चित्रपटांतून अभिनय करत कतरिनाने हिंदी चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. अनेक चाहत्यांच्या पसंतीस उतरलेली कतरिना तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फेसबुकवर साक्रिय झाली आहे. तिने फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. कतरिना या व्हिडिओत समुद्रकिनारी असलेल्या इमारतीतील तिच्या घरातून बाहेर येताना दिसत आहे. स्वत:चे खासगी आयुष्य सहसा प्रसारमाध्यमांसमोर न आणणाऱ्या कतरिनाचा हा खास व्हिडिओ तिच्या वाढदिवशी प्रचंड गाजत आहे.
अभिनेता रणबीर कपूरसोबत ‘ब्रेकअप’ नंतर बराच काळ सोशल मीडियापासून दूर असलेल्या कतरिनाच्या ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाबाबत सिनेरसिकांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे. या चित्रपटात कतरिना कैफ आणि रणबीर कपूर हे दोघेही महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. दरम्यान, सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अल्विरा खान अग्निहोत्री, करण जोहर, अयान मुखर्जी, कबीर खान या काही सेलिब्रिटी मित्रमंडळींसोबत कतरिनाने तिचा वाढदिवस साजरा केला आहे. दरम्यान एकिकडे कतरिनाच्या या ‘बर्थडे पार्टी’ला अभिनेता रणबीर कपूरने गैरहजर राहणेच पसंत केले असले तरीही सलमान खानने मात्र तिला एका पत्रकार परिषदेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.