आपल्या अदांनी, सौंदर्याने आणि नृत्याने घायाळ करणारी धक धक गर्ल अर्थात माधुरी दीक्षित हिचा आज वाढदिवस. बॉलिवूडची ही अभिनेत्री तिच्या सौंदर्यासाठी आणि सुंदर हास्यासाठी ओळखली जाते. नृत्यात तर तिला कोणीच मात देऊ शकत नाही. स्मितहास्य अन् लाजाळू भाव तिच्या सौंर्याला चार चाँद लावतात.

‘अबोध’मधून पदार्पण करत माधुरीने तिच्या सामर्थ्याची चुणूक दाखवून दिली. खोडकर मुलगी असो वा कणखर व्यक्तिरेखा… रोमँटिक असो वा नृत्याचा बाज या सर्वच भूमिका साकारून तिनं आपल्या मनात अभिनयाचा न पुसला जाणारा ठसाच उमटवलाय म्हटलं तर वावगं ठरू नये.
‘आजा पिया आई बहार…’ म्हणत तरूणाईच्या गळ्यातील ताईत बनलेली ही अप्सरा ‘हम आपके है कौन?’ सारख्या कौटुंबिक सिनेमातून आजी-आजोबांना आपलंस करते. अर्थात दोन्हीं पिढ्यांच्या मनावर अधिराज्य फक्त तिनेचं गाजवलं असं म्हणायला ही हरकत नाही. ही अप्सरा काम करताना आज्ञाधारकता व चिकाटीचा आदर्श ठेवते आणि बॉलिवूड क्षेत्रात इतर अभिनेत्रींपेक्षा सरसही ठरते.

तिच्या या गुणाला पारखूनच तर ‘पूर्णपणे दिग्दर्शकाची अभिनेत्री असणारी कोणतीही अभिनेत्री भारतात नाही’, अशी पुष्टी खुद्द काजल देऊन मोकळी होते. तिच्याकामाबाबत सांगायचे तर एकदा माधुरी दोन शिफ्ट करून संध्याकाळी सातच्या सुमारास सुप्रसिद्ध छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांच्याकडे फोटो काढण्यासाठी गेली होती. सिल्कचा कोट घातलेला फोटो काढताना तो हवेत उडावा, अन तो कॅमेऱ्यात उतरावा अशी कल्पना राजाध्यक्षांच्या डोक्यात घोळत होती. जॅकेट हवेत उडावे यासाठी अनेक पंखे लावलेले असतानाही कोट काही केल्या उडत नव्हता. मग त्यांनी माधुरीला गिरकी घेऊन खाली बसायला सांगितलं. हा प्रकार तिने तब्बल १२० वेळा केला. कदाचित एखाद्या शूटसाठीही तिने इतके रिटेक दिले नसतील. यातूनच कामाबद्दलची तिची चिकाटी आणि आज्ञाधारकतेच्या गुणाची प्रचिती येते. या घटनेनंतर जेव्हा राजाध्यक्षांनी फोटोशूटवेळी माधुरीला झालेल्या त्रासाबद्दल क्षमा मागण्यासाठी फोन केला, यावेळी तिने ‘मला खूप मज्जा आली’ असे सांगत राजाध्यक्षांना थक्क केले. त्यांच्या सोबतच्या फोटोशूटमध्ये तिचा आणखी एक किस्सा राजाध्यक्षांनी आठवणीने नोंद करुन ठेवला आहे. हा किस्सा तिच्या सौंदर्याला एक वेगळी उंची देऊन जाणारा असाच आहे.

सोनेरी केसांचा विग आणि लेदरच जँकेट घालून फोटोशूट करताना माधुरीला राजाध्यक्षांनी ‘थिंक मन्रो’ असं सांगितलं होतं. त्यांचे हे वाक्य तिने इतके मनावर घेतले की, तिने दिलेली पोझ व चेहऱ्यावरील भावातून साक्षात मर्लिन मन्रोच अवतरल्याचा भास झाल्याचं वर्णन खुद्द राजाध्यक्षांनी करून ठेवलंय. एवढंच नव्हे तर… फोटो प्रिंट काढताना लंडनमधील एकाने अतिशय गंभीरपणे राजाध्यक्षांना विचारले की, मन्रोवर होणाऱ्या सिनेमात काम करायला या मुलीला आवडेल का? मर्लिन मन्रो ही आतापर्यंतची जगातील सर्वात सुंदर स्त्री समजली जाते… तिच्याबरोबरची तुलना हीच माधुरीच्या सौंदर्याची पोचपावती.

आता सुंदर असणं काय असतं?… याची ओळख करून देणारा माधुरीचा हा दुसरा किस्सा भन्नाट आहे. दादरच्या रूपारेल महाविद्यालयात सुधीर गाडगीळांना दिलेल्या पहिल्या मुलाखतीत तिने सुंदरता काय असते, याची जाणीव करून दिली. मुलाखतीस सुरूवात करण्यापूर्वी पहिल्या रांगेत बसलेल्या सुलोचनादीदी, सुधीर फडके आणि बाबासाहेब पुरंदरे या तिघांना तिने वाकून केलेला नमस्कार मराठी संस्कृतीचे दर्शन देऊन जाणाराच होता.

माधुरीच्या खाद्यपदार्थाच्या आवडीविषयी बोलायचे तर आजही उकडीचे मोदक, पुरणपोळी आणि बटाटा पोहे या पदार्थांच्या आवडीत तिनं आपल मध्यमवर्गीय मराठी बाणा जपल्याची साक्ष मिळते. बॉलिवूडमध्ये ‘डोला रे डोला’ करणाऱ्या या अप्सरेला ‘पिंजरा’ हा मराठी सिनेमा आजही लय भारी वाटतो. अस्सल मराठी तारका जी बॉलिवूडमध्ये सम्राज्ञीसारखी वावरली अशा लावण्यवतीला वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!