गुन्ह्यात दोषी ठरल्यानंतर कोठडीत जाण्याची वेळ येताच हॉस्पिटल गाठणारे आरोपी आपण आपल्या देशात अनेकदा पाहिले आहेत. असाच प्रकार आता एका हॉलिवूड चित्रपट निर्मात्याच्या बाबतीतही घडला आहे. त्याला कोठडीत जाण्याची वेळ आली आणि त्याच वेळी त्याच्या छातीत दुखायला लागलं. आता तो काही दिवस तरी कोठडीऐवजी हॉस्पिटलमध्ये काढू शकणार आहे. हे प्रकरण आहे जगप्रसिद्ध ‘मी टू’ चळवळ ज्यातून सुरू झाली त्या हार्वे वेन्स्टिनचे.

हॉलिवूड चित्रपट निर्माता हार्वे वेन्स्टिनवर करण्यात आलेले लैंगिक शोषणाचे अरोप अखेर सिद्ध झाले आहेत. गेल्या दोन वर्षात ‘# मी टू’ या चळवळीअंतर्गत अँजेलिना जोली, एशिया अर्गेटो, ग्वेनेथ पाल्ट्रो, लॉरेन सिवन, एमा वॉटसन यांसारख्या तब्बल १०० पेक्षा अधिक प्रतिष्ठित अभिनेत्रींनी हार्वेविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. यांपैकी Lauren Young, Tarale Wulff, Dawn Dunning, Miriam Haley, Annabella Sciorra या अभिनेत्रींनी केलेले आरोप अखेर न्यायालयात सिद्ध झाले आहेत. आधीच पाठीच्या दुखण्यामुळे व्हिलचेअरवर कोर्टात हजर राहात असलेल्या हार्लेला शिक्षा सुनावण्याआधीच छातीत दुखायला लागले. त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

तीन वर्षांपूर्वी हॉलिवूड सिनेसृष्टीत महिलांच्या संरक्षणाच्या निमित्ताने ‘# मी टू’ ही चळवळ सुरू झाली. या चळवळी अंतर्गत हॉलिवूडमधील अनेक बडे कलाकार, दिग्दर्शक, निर्मात्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप केले गेले. या सर्वांमध्ये हार्वे वेन्स्टिन हे नाव आघाडीवर होते. हार्वेवर एक-एक करत तब्बल ११४ अभिनेत्री आणि मॉडेल्सनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. पुढे प्रकरण कोर्टात गेले. गेली दोन वर्षे न्यूयॉर्कच्या न्यायालयात हार्वेविरोधात हा खटला होता. अखेर ११४ अभिनेत्रींपैकी पाच अभिनेत्रींनी केलेले आरोप सिद्ध झाले आहेत.

हार्वेने त्यांना चित्रपटात काम मिळवून देण्याचे अमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार केले. हार्वेवर या अभिनेत्रींनी थर्ड डिग्री रेपचा अरोप केला होता. हे आरोप पुराव्यानिशी सिद्ध झाले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे आरोप सिद्ध झाल्यानंतर न्यायाधिश हार्वेला शिक्षा सुनावणार इतक्यात त्याला हृदय विकाराचा झटका आला. त्यामुळे त्वरित त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्याच्या शिक्षेवर ११ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. त्याला ५ ते २९ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होण्याची शक्यता आहे. २० लाख डॉलर्स भरून जामिनावर बाहेर असलेल्या हार्वेला कोठडीत ठेवण्याचे आदेश सोमवारी कोर्टाने दिले होते. मात्र, आता त्याला छातीच्या दुखण्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.