‘दंगल’ हा चित्रपट सध्या तिकीटबारीवर चांगली कमाई करत आहे. महावीर सिंग फोगट आणि त्यांच्या मुलींच्या जीवनावर, कारकीर्दीवर बेतलेले कथानक या चित्रपटाद्वारे साकारण्यात आले आहे. अभिनेता आमिर खान, फतिमा सना शेख, सान्या मल्होत्रा या कलाकारांनी रुपेरी पडद्यावरर साकारलेल्या व्यक्तीरेखांनाही प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली आहे. मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर या निर्णयाचा आमिरच्या ‘दंगल’ या चित्रपटावर परिणाम होणार का? याबद्दल आमिरच्या मनातही अनेक प्रश्न होते. पण, चित्रपटाच्या कमाईचे सध्याचे आकडे पाहता ‘दंगल’ने विक्रमी कमाई केल्याचे कळत आहे.

या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांतच १०० कोटींच्या कमाईचा आकडा पार करत बॉक्स ऑफिसवरील इतर चित्रपटांच्या आतापर्यंतच्या कमाईचे सर्वच विक्रम मोडीत काढले होते. ‘सुलतान’, ‘पीके’ यांसारख्या चित्रपटांनाही आमिरच्या ‘दंगल’ने कमाईच्या बाबतीत पिछाडवर टाकले आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच्या सहा दिवसांमध्येच आमिरच्या या चित्रपटाने देशातील तिकीटबारीवरही चांगलीच ‘दंगल’ करत १७६.९८ कोटींची कमाई केली आहे. तर, आंतरराष्ट्रीय पातळीवर पाहिल्यास या चित्रपटाने २७६ कोटींचा गल्ला जमवला आहे. नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतेच पन्नास दिवस उलटले. या निर्णयानंतर पहिल्या काही दिवसांमध्ये जे काही गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत होते त्यातून जनता आता बऱ्यापैकी सावरलेली आहे. त्यामुळे, अनेकांनी असा अंदाज बांधला की, नोटाबंदीच्या निर्णयाची झळ आमिरच्या ‘दंगल’ चित्रपटाला लागलीच नाहीये.

किंबहुना, नोटाबंदीच्या निर्णयानंतर प्रदर्शित झालेल्या ‘रॉक ऑन २’, ‘फोर्स २’ आणि ‘बेफिक्रे’ या चित्रपटांवर त्याचा थेट परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. ‘रॉक ऑन २’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी आणि जावेद अख्तर यांनीही पंतप्रधानांच्या नोटाबंदीच्या निर्णयालाच दोष दिला होता. त्यामुळे या चित्रपटांमागोमागच प्रदर्शित होणाऱ्या आमिरच्या ‘दंगल’ या चित्रपटाला सध्या मिळणारा प्रतिसाद पाहता अनेकांचे असे म्हणणे आहे की, नोटाबंदीच्या संकटावर मात करत या चित्रपटाच्या वाट्याला हे यश आले आहे. पण, खरंच असं आहे का?

‘दंगल’ने आतापर्यंत केलेल्या बॉक्स ऑफिस कमाईचे आकडे पाहिले तर, प्रदर्शनानंतर या चित्रपटाने १७७ कोटींची कमाई केली होती, असे वृत्त इंडिया टुडेने प्रसिद्ध केले आहे. जनसंख्या स्थिरता कोषच्या अहवालानुसार ११ जुलै २०१५ ला भारताची लोकसंख्या १२७,४२,३९,७६९ म्हणजेच १२७.४२ कोटी इतकी होती. याच आकड्यांच्या अनुशंगाने जरी अंदाज बांधायचा झाला चित्रपटाचे एक तिकीट सरासरी १०० रुपये असेल तरीही जवळपास १,७७,७०,००० म्हणजेच १.७७ कोटी जनतेनेच हा चित्रपट पाहिल्याचे स्पष्ट होत आहे. याचाच अर्थ असा की, १२७ कोटी भारतीयांपैकी १.७७ कोटी भारतीयांनीच ‘दंगल’ हा चित्रपट पाहिला आहे. हा आकडा पाहता आतापर्यंत फक्त लोकसंख्येच्या १.४ टक्के लोकांनीच चित्रपट पाहिल्याचे समजत आहे. त्यामुळे इथे राहून राहून हाच प्रश्न उद्भवत आहे की, खरंच आमिरच्या ‘दंगल’ या चित्रपटावर नोटाबंदीचा परिणाम झाला आहे की नाही?