भारतीय चित्रपटसृष्टीत विक्रम प्रस्थापित केलेल्या ‘बाहुबली’ चित्रपटात ‘भल्लादेवा’ची भूमिका साकारलेला अभिनेता राणा डग्गूबती चित्रपटाच्या सिक्वलसाठी जोरदार तयारी करतोय. सिनेरसिकांची दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांच्या ‘बाहुबली-२’ चित्रपटाबाबतची उत्कंठा दिवसेंदिवस वाढत आहे.

‘बाहुबली’तील नायक प्रभाससोबतच अभिनेता राणा डग्गूबतीच्या भूमिकेला प्रेक्षकांची वाहवा मिळाली होती. डग्गूबती सध्या एका दुसऱया चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात तो एका नौदल अधिकाऱयाच्या भूमिकेत दिसेल. याकरिता त्याला आपले वजन काही किलोने घटवावे लागले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण आटपून डग्गूबती बाहुबली-२ च्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे. त्यामुळे बाहुबली-२ साठी राणाला पुन्हा एकदा काही किलोने वजन वाढवावे लागणार असून त्यासाठी त्याचे काही ट्रेनिंग सेशन्स देखील होणार आहेत. याशिवाय, त्याला डाएट देखील पाळावे लागेल.
याविषयी बोलताना राणा डग्गूबती म्हणाला की, वजन वाढविण्यासाठी तुम्हाला एका जागी बसून खूप खावे लागते. पण, वजन वाढविण्यासोबतच मला पीळदार शरीरयष्टी तयार करायची आहे. हे सर्वात कठीण काम आहे. ठराविक पदार्थच खाणे आणि डाएटला फॉलो करणे हे सर्वात कठीण काम असतं. वजन कमी करणे हे केव्हाही सोपे असते. पण कमी केलेले वजन काही कालावधीसाठी पुन्हा वाढविणे हे सहजसोपे काम नाही.
दरम्यान, आधीचे सर्व चित्रपटांच्या कमाईचे विक्रम मोडीत काढलेल्या ‘बाहुबली’चा सिक्वल यंदाच्या वर्षात दाखल होण्याची शक्यता आहे.