सध्या सोशल मीडियावर ‘बिग बॉस’च्या बाराव्या सिझनमध्ये सहभागी झालेले स्पर्धक जसलीन मथारू व भजनसम्राट अनुप जलोटा चर्चेत आहेत. या चर्चा त्यांनी शेअर केलेल्या फोटोंमुळे सुरु झाल्या आहेत. हे फोटो पाहून अनेकांनी त्या दोघांचे लग्न झाले असल्याचे म्हटले आहे. पण आता अनुप यांनी वक्तव्य करत या सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे.
अनुप जलोटा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये जसलीन नवरी प्रमाणे गुलाबी रंगाचा लेहंगा व भरजरी दागिनेसुद्धा परिधान केले आहेत. तिच्या हातात लाल रंगाच्या बांगड्या दिसत असून लग्नानंतर घालण्यात येणारा ‘चुडा’ असल्याचे म्हटले जात आहे. तिच्या बाजूला भजनसम्राट म्हणून ओळखले जाणारे अनुप जलोटा हे शेरवानी, शाल आणि पगडी या वेशभूषेत पाहायला मिळाले. त्यांचे हे फोटोपाहून त्यांनी लग्न केल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. पण आता या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.
नुकताच इंडिया टूडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांना या फोटोंविषयी विचारण्यात आले होते. त्यावर त्यांनी हे लग्नातील फोटो नसून एका चित्रपटातील आहेत असे म्हटले आहे. ‘हे फोटो जसे वाटत आहेत तसे नाहीत. हे फोटो माझा आगामी चित्रपटातील एका सीनमधील आहेत. त्यामध्ये जलसीन माझ्या विद्यार्थीनीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात जसलीनचे लग्न होणार आहे आणि मी तिच्या वडिलांची भूमिका साकारणार आहे’ असे अनुप यांनी म्हटले आहे.
‘अनेक लग्नांमध्ये वडिल अशा वेशभूषेत असतात. हा फोटो खोटा नाही. पण तो माझ्या आगामी चित्रपटामधील आहे. या चित्रपटाचे दोन दिवसांचे चित्रीकरण बाकी आहे. हा फोटो लोकांनी चुकीच्या अर्थाने घेतला आहे’ असे त्यांनी पुढे म्हटले आहे.
‘बिग बॉस १२’मध्ये जसलीन आणि अनुप जलोटा एकत्र दाखल झाले, तेव्हापासूनच या दोघांविषयी जोरदार चर्चा सुरू झाली होती. मात्र आमच्यात फक्त गुरू-शिष्याचं नातं असल्याचं दोघांनी स्पष्ट केलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 10, 2020 4:22 pm