पडद्यावर साकारलेली प्रत्येक भूमिका ही त्या त्या कलाकाराच्या आयुष्यात थोडाफार का होईना आपला प्रभाव सोडते. अशा बराचशा भूमिका असतात, ज्या साकारल्यानंतरही कलाकारांच्या खासगी आयुष्यावर त्याचा परिणाम जाणवत असतो. उदाहरण द्यायचे झाल्यास, ‘पद्मावत’ या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंगने साकारलेल्या अल्लाउद्दीन खिल्जी या नकारात्मक भूमिकेचा त्याच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता. त्या भूमिकेच्या नकारात्मक प्रभावातून बाहेर पडण्यासाठी त्याला मानसोपचारतज्ज्ञांचा आधार घ्यावा लागला होता. हेच हॉलिवूडविषयी सांगायचे झाल्यास, ‘जोकर’ ही तुफान गाजलेली भूमिका आजवर ज्यांनी ज्यांनी साकारली त्यांना मानसिक आजार सहन करावा लागला. असंच काहीसं अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या बाबतीत झालं आहे. दीपिकाने नुकतंच आगामी ‘छपाक’ या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आणि शूटिंगच्या शेवटच्या दिवशी तिने भूमिकेसाठी वापरलेले सर्व प्रोस्थेटिक्स जाळून टाकले. याविषयी खुद्द दीपिकाने एका मुलाखतीत खुलासा केला.

‘छपाक’ या चित्रपटाची कथा अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटात दीपिका ही लक्ष्मीची भूमिका साकारत असून त्यासाठी तिने प्रोस्थेटिक मेकअपचा वापर केला. या भूमिकेचा तिच्यावर इतका परिणाम झाला की शूटिंगच्या शेवटच्या दिवशी ते प्रोस्थेटिक जाळले. ”शेवटच्या दिवशी मी जे प्रोस्थेटिक वापरले ते मला अक्षरश: जाळून टाकावे लागले. इतक्या खोलवर या भूमिकेचा माझ्यावर प्रभाव होता. याआधी मला असा अनुभव कधीच आला नव्हता. त्या भूमिकेद्वारे मी जे काही अनुभवलं त्यातून बाहेर पडण्यासाठी तो एक मार्ग होता,” असं दीपिकाने सांगितलं.

https://www.instagram.com/p/Bvao-MEAT56/

आणखी वाचा : सावळ्या रंगाची प्रतिभा आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर

याविषयी ती पुढे म्हणाली, ”प्रोस्थेटिक्स फार महागडे असतात. त्याच्या एका तुकड्याची किंमतसुद्धा फार जास्त असते. पण निर्माती म्हणून मी तो निर्णय घेतला आणि म्हणाली, मला किंमतीची फार काळजी नाही, पण मानसिकरित्या त्या नकारात्मक परिणामातून बाहेर पडायचं होतं. प्रोस्थेटिकचा एक तुकडा तयार करण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतात. शेवटच्या दिवशी मी माझ्या मेकअप आर्टिस्टकडून प्रोस्थेटिक घेतलं आणि सेटवर एका कोपऱ्यात जाऊन ते जाळून टाकलं. ते जळून पूर्ण राख होईपर्यंत मी त्याकडे एकटक पाहत उभे होते.”

‘छपाक’मधील लक्ष्मीची भूमिका साकारतानाच आलेला अनुभव मी आधी कधीच अनुभवला नसल्याचं दीपिका सांगते. या वर्षाच्या सुरुवातीला ‘छपाक’च्या शूटिंगची सुरुवात झाली होती. तर जानेवारी २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मेघना गुलजार या चित्रपटाची दिग्दर्शक आहे.