आजकाल आपण बॉलिवूडमधील अनेक कलाकार हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करताना पाहतो. पण बॉलिवूडमधील अशी मोजकीच गाणी आहेत जी हॉलिवूड चित्रपटांमध्ये वापरली गेली आहेत. त्यामधील एक म्हणजे ‘दिल से…’ चित्रपटातील ए. आर. रेहमान यांचे ‘छैय्या छैय्या.’ आज ६ जानेवारी रोजी ए. आर. रेहमान यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांचे छैय्या छैय्या हे गाणे कोणत्या हॉलिवूड चित्रपटात वापरण्यात आले आणि निर्मात्यांनी ते का वापरले हे आपण जाणून घेणार आहोत.

अभिनेत्री मलायका अरोरा आणि शाहरुख खानचे  हे गाणे २००६ मध्ये प्रदर्शित झालेला हॉलिवूड चित्रपट ‘Inside Man’च्या सुरुवातीला वापरण्यात आले होते. ‘Inside Man’ या चित्रपटाचे दिग्दर्शन स्पाइक ली (Spike Lee) यांनी केले आहे. एका यूजरने चित्रपटातील गाण्याचा व्हिडीओ शेअर करत गाणे वापरण्यामागचे कारण सांगितले आहे. या यूजरने चित्रपटाच्या निर्मात्यांना हे गाणे प्रचंड आवडले म्हणून वापरण्यात आले की त्या गाण्याच्या वापरण्यामागे आणखी काही कारण होते याचा खुलासा केला होता.

यूजरने सांगितल्या प्रमाणे इनसाइड मॅन या चित्रपटाचे निर्माते एका फिल्मस स्कूलमध्ये शिक्षक म्हणून देखील काम करत होते. तेव्हा शाळेतील मुलांनी त्यांना ‘दिल से…’ हा चित्रपट पाहण्यास सांगितले होते. या चित्रपटातील छैय्या छैय्या हे गाणे अतिशय लोकप्रिय होते आणि स्पाइक ली यांना ते गाणे प्रचंड आवडले. त्यामुळे त्यांनी त्या गाण्याचा वापर त्यांच्या चित्रपटात करण्याचे ठरवले. स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार या गाण्याची काही रचना इनसाइड मॅन चित्रपटासाठी बदलण्यात आली होती.

२२ वर्षांपूर्वी दिल से हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या गाण्यातील ‘छैय्या छैय्या’ हे गाणे त्यावेळी भलतेच गाजले होते. हे गाणे ए. आर. रेहमान यांनी कम्पोज केले असून सुखविंदर सिंग आणि सपना अवस्थी यांनी गायले आहे.