एकीकडे करणी सेनेकडून संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ चित्रपटाला तीव्र विरोध होत असताना दुसरीकडे प्रेक्षकांचा मात्र त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये मुख्य भूमिका साकारलेल्या दीपिका पदुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंगच्या अभिनयाचीही प्रेक्षक-समीक्षकांकडून प्रशंसा होत आहे. मात्र, महारावल रतन सिंह यांच्या भूमिकेसाठी शाहिद भन्साळींची पहिली पसंती नव्हता. बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुखला या भूमिकेसाठी विचारण्यात आले होते.

शाहरुखला त्यावेळी ऐतिहासिक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारायची नव्हती. त्यामुळे त्याने भन्साळींच्या ‘पद्मावत’ला नकार दिला. इतकेच नव्हे तर सुरुवातीला त्याने मानधनाचा आकडा दुप्पट करून मागितल्याचेही म्हटले जाते. एका चित्रपटासाठी शाहरुख ४५ ते ५० कोटी रुपये इतके मानधन घ्यायचा, मात्र ‘पद्मावत’साठी त्याने ९० कोटींची मागणी केली. हा आकडा ऐकून भन्साळींनी शाहरुखऐवजी दुसऱ्या अभिनेत्याला राजा रावल रतन सिंह यांच्या भूमिकेसाठी घ्यायचे ठरवले.

वाचा : FBवर ‘पद्मावत’ लीक, शेअर करणाऱ्यांनाही होऊ शकतो ५ लाखांचा दंड

अखेर शाहिद कपूरला ही भूमिका मिळाली आणि त्याने संधीचे सोने केले. विशेष म्हणजे शाहिदने या भूमिकेसाठी अवघे ९ ते १० कोटी रुपये इतकेच मानधन घेतले. गुरुवारी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून येत्या काळात चांगलीच कमाई करणार असल्याचे म्हटले जात आहे.