जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात घडणाऱ्या गोष्टींचे पडसाद क्षणार्धातच सोशल मीडियावर उमटू लागतात, याचं उदाहरण अनेकदा पाहिलं गेलं आहे. सध्या बॉलिवूडमध्येही अशा काही घडामोडी घडत आहेत, ज्याची बरीच चर्चा होत असून सोशल मीडियावरही या गोष्टी ट्रेंडमध्ये आल्या आहेत. अशाच बहुचर्तिच गोष्टींमधील एक उदाहरण म्हणजे अभिनेता, मॉडेल मिलिंद सोमणचा विवाहसोहळा. मिलिंदने नुकतच त्याची प्रेयसी अंकिता कोनवार हिच्यासोबत अलिबागमध्ये लग्नगाठ बांधली.

मराठी आणि आसामी पद्धतीमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला. यावेळी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. मिलिंद आणि अंकिता लग्नबंधनात अडकल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्या विवाहसोहळ्यातील फोटो लगेचच व्हायरल होण्यास सुरुवात झाली. पण, या सर्व गोंधळात टेलिव्हिजन अभिनेत्री अंकिता लोखंडेसुद्धा गुगलवर ट्रेंडमध्ये आली. तसं पाहायला गेलं तर मिलिंद आणि अंकिता लोखंडे यांचा दुरदूरपर्यंत काहीच संबंध नाही. पण, मिलिंदच्या पत्नीचं नावही अंकिता असल्यामुळे फक्त आणि फक्त नावांमध्ये असणारं साम्य पाहता हा गोंधळ झाला होता.

वाचा : मित्राच्या ‘त्या’ एका वाक्यामुळे सचिन मुंबईच्या रस्त्यावर खेळला क्रिकेट

नावं एककारखीच असल्यामुळे हा गोंधळ झाला खरा. पण, क्षणार्धासाठी खुद्द अंकिता लोखंडेलासुद्धा हा सर्व प्रकार नेमका काय आहे याचा अंदाज आला नसावा असंच म्हणावं लागेल. सोशल मीडियावरील अनिश्चिततेच्या या दुनियेत कधी काय ट्रेंडमध्ये येईल याचा काहीच नेम नसतो, याचच हे उत्तम उदाहरण आहे. याआधीही अभिनेता सोनू सूद आणि गायक सोनी निगम यांच्या नावांमध्ये साम्य असल्यामुळे नेटकऱ्यांचा गोंधळ उडाला होता.

https://www.instagram.com/p/Bh5_7lkgezc/

‘अंकिता’ या एका नावामुळे झालेला हा गोंधळ काही वेळानंतर सावरलाही गेला. पण, त्याच्या चर्चा मात्र अद्यापही सुरुच आहेत. या साऱ्यामध्ये मिलिंद आणि अंकिता कोनवारच्या नव्या नात्यानेही अनेकांचं लक्ष वेधलं आहे. दोघांच्याही वयामध्ये असणारं अंतर पाहता प्रेमाला वयाची सीमा नसते हे त्यांच्याकडे पाहून पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचं लक्षात येत आहे.