|| रेश्मा राईकवार

एखादा चांगला विषय तोंडी लावण्यापुरता घेऊन त्याचे भजे करण्याचा हिंदी चित्रपटसृष्टीचा अट्टहास नवा नाही. हिरो म्हणून एखाद्याला उभे करताना कोणत्यातरी गाजलेल्या चित्रपटाची कथा उचलायची आणि रिमेकच्या नावाखाली भोंगळ मनोरंजन प्रेक्षकांना द्यायचे ही परंपरा दोन वर्षांनी प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या ‘राधे’ने पुरेपूर जपली आहे. तर्क खुंटीला टांगूनच मनोरंजन करायची सलमानच्या चित्रपटांची पद्धत आहे, मात्र या चित्रपटात मनोरंजनालाही तिलांजली मिळाली आहे.

एखादा चित्रपट खूप हट्टाने हाती घ्यावा आणि नंतर तो कं टाळल्यागत तुकड्या-तुकड्यांत पूर्ण केलेला असावा, इतक्या हलगर्जीपणाने ‘राधे : युवर मोस्ट वाँटेड भाई’ हा चित्रपट के ला आहे. ‘द आऊटलॉज’ या कोरिअन चित्रपटाचा हा रिमेक आहे. आणि त्याला प्रभुदेवानेच एके काळी दिग्दर्शित के लेल्या ‘वाँटेड’च्या नावाची थोडीफार पुण्याई जोडण्याचा प्रयत्न के ला आहे. २००९ साली प्रदर्शित झालेल्या ‘वाँटेड’ या प्रभुदेवा दिग्दर्शित चित्रपटानेच सलमानच्या उतरत्या कारकीर्दीला नवं वळण मिळालं होतं. त्यामुळे त्याचाच सिक्वल या अर्थाने ‘राधे’चा घाट घालण्यात आला होता, मात्र इथे तोही धड फळाला आला नाही. ‘वाँटेड’ची किं चितशीही सर या नव्या चित्रपटाला नाही. राधे नामक अन्डरकव्हर पोलीस अधिकाऱ्याची कथा इथे पाहायला मिळते. सलमान खानचा पडद्यावरचा हिरो प्रवेश इथे पुरता फसला आहे. तरीही सलमानच्या चित्रपटात तो महत्त्वाचा असतो. त्यामुळे तो टाळून पुढे जाता येत नाही. तर मुंबई शहरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अमली पदार्थ सहज उपलब्ध करून त्यांना व्यसनात अडकवणारं रॅके ट कार्यरत झालं आहे. नशेच्या आहारी गेलेली मुलं आत्महत्येचा मार्ग निवडतात. वेगाने पसरत चाललेल्या या रॅके टवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलेले मुंबई पोलीस अखेर या मोहिमेसाठी सध्या सक्तीच्या रजेवर असलेल्या राधेला पाचारण करतात. निर्दयी गुंडांचा सामना करण्यासाठी तितक्याच निर्दयतेने वार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची गरज आहे या तर्कावर आणला गेलेला राधे मग आपल्या स्टाईलने साफसफाई करतो असे या चित्रपटाचे कथानक आहे.

सलमानचा चित्रपट असल्याने त्याच्यापेक्षा मोठं कोणीच असू शकत नाही. तरी नाही म्हणायला त्याच्या डोक्यावर अभ्यंकर नामक पोलीस अधिकाऱ्याच्या रूपाने अभिनेता जॅकी श्रॉफची वर्णी लावली गेली आहे. या चांगल्या अभिनेत्याचा पार खेळखंडोबा झाला आहे या चित्रपटात… दिशा पटानी नामक ललना ‘भारत’मध्ये एका गाणे आणि काही दृश्यापुरती मर्यादित होती तरी तिला तिथे काहीएक काम होते. इथे आपल्याला बुद्धीच नाही आहे अशा थाटात नाचणाऱ्या आणि सतत राधेला भोलू भोलू म्हणत त्याच्या मागेपुढे करणाऱ्या नायिके च्या रूपात ती वावरली आहे. बाकी हाणामारीचा चित्रपट आहे, त्यामुळे भरपूर व्हीएफएक्सचा वापर करून के लेली खोटी हाणामारी आपल्याला पाहायला मिळते. वर म्हटल्याप्रमाणे महाविद्यालयीन विद्यार्थी आणि त्यांना अमली पदार्थांच्या व्यसनात अडकवणाऱ्या टोळीचा विषय इथे नावापुरता वापरण्यात आलेला आहे. प्रत्येक गोष्टीत विनोद करण्याचा अट्टहास कशासाठी? अगदी सुरुवातीच्या अ‍ॅक्शन दृश्यांपासून नको तिथे आणि नको तशा पद्धतीने सुमार विनोदाची पेरणी करण्याच्या नादात धड हाणामारीचा चित्रपट म्हणूनही तो उभा रहात नाही. ‘राधे’सारख्या चित्रपटांना मुळात कथा नसतेच, त्यांना असतो तो फक्त हिरो. मग हिरोला अमुक एका पद्धतीने आळस द्यावासा वाटतो आहे, तमुक एका पद्धतीने कमर हलवावीशी वाटते आहे आणि बाकी दिग्दर्शकाने सांगितलंच आहे म्हणून उठून अ‍ॅक्शन म्हटले की हवेत हातवारे करायचे अशा पद्धतीने हिरो काम करतो. आणि बाकी सगळ्या कलाकारांचे काम हे हिरोची गोष्ट पुढे नेण्यासाठी जे जे पूरक ते ते करणे यापलीक डे काही उरतच नाही. नाचगाण्यांच्या बाबतीत सलमानने यावेळी निवडलेली स्टाईल पाहून तर आपण न राहवून आनंदाश्रूच गाळू लागतो.

खरे तर करोनाने बाहेर गंभीर रूप धारण के ले आहे. सतत चिंतेत आणि तणावात वावरणाऱ्या लोकांना मनोरंजनाची गरज आहे हे वास्तव आहे. पण म्हणून इतक्या वर्षांनी प्रेक्षकांपर्यंत चित्रपट नेताना आपण काय करत आहोत, काय देत आहोत याचं जराही भान ना सलमानसारख्या कलाकाराला उरलं आहे ना प्रभुदेवासारख्या दिग्दर्शकाला. मनोरंजनालाच तिलांजली देत के ल्या जाणाऱ्या या चित्रपटांचे हशील काय, हा प्रशद्ब्रा अनुत्तरितच राहतो.

राधे : युवर मोस्ट वाँटेड भाई

दिग्दर्शक – प्रभुदेवा

कलाकार – सलमान खान, जॅकी श्रॉफ, दिशा पटानी, सुधांशू पांडे, प्रवीण तर्डे, मेघना आकाश, रणदीप हुडा.