आई हिरकणीने आपल्या बाळासाठी केलेले धाडस आता रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार याचा आनंद आणि उत्साह दिवसेंदिवस वाढत आहे. गोष्टीत ऐकलेले हिरकणीचे धाडस चित्रपटाच्या ट्रेलरमधून पाहताना अंगावर अक्षरश: शहारे येतात. माय माऊली हिरकणीच्या गोष्टीसह या चित्रपटातील एक नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. विशेष म्हणजे त्या गाण्याला आरतीचे स्वरुप देण्यात आले आहे. हिरकणी ही एका सामान्य आईची शौर्यगाथा आहे आणि आईची शौर्यगाथा गौरविण्यासाठी असं काहीतरी केलं पाहिजे जे कायमचं स्मरणात राहिल असा विचार दिग्दर्शक प्रसाद ओक यांच्या मनात चालू होता.

‘आईची आरती’ गाण्यासाठी कोणीतरी तितक्याच ताकदीची गायिका हवी, जिच्या आवाजाने ह्रदय भरुन येईल आणि यासाठी चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर राजेश मापुस्कर यांनी आशा भोसले यांचे नाव सुचविले. अशाप्रकारे हिरकणीमध्ये गानसम्राज्ञी आशा भोसले यांच्या मधुर आणि जादूई आवाजाने सजलेली ‘आईची आरती’ प्रेक्षकांना अनुभवण्याची संधी मिळणार आहे. या गाण्याचे बोल संदिप खरे यांनी लिहिले आहे तर संगीत अमितराज यांनी दिले आहे.

आणखी वाचा : ‘हिरकणीला थिएटर द्या, नाही तर काचा फुटणार’, मनसेचा खळखट्याकचा इशारा  

”आई भवानीला सगळीकडे पोहचता येत नाही म्हणून तर तिने आई बनवली” आणि याच आईसाठी कायमचा मानाचा मुजरा म्हणून हिरकणीच्या टीमने ‘आईची आरती’ बनवली.

प्रसाद ओक दिग्दर्शित आणि चिन्मय मांडलेकर लिखित ‘हिरकणी’ चित्रपटात सोनाली कुलकर्णी, अमित खेडेकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. २४ ऑक्टोबरला ‘हिरकणी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.