15 October 2019

News Flash

तिकीटबारीवर हॉलीवूड यंदाही जोरात!

गेल्या वर्षी तब्बल १३ ते १४ हॉलीवूडपटांनी तिकीटबारीवर चांगली कमाई केली होती.

(संग्रहित छायाचित्र)

गेल्या काही वर्षांत हॉलीवूडपटांनी आपल्याकडे तिकीटबारीवर मिळवलेले यश मोठे आहे. गेल्या वर्षी तब्बल १३ ते १४ हॉलीवूडपटांनी तिकीटबारीवर चांगली कमाई केली होती. त्यातही ‘अ‍ॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर’ या चित्रपटाने २२२.६९ कोटी रुपये कमाई करत नवाच विक्रम केला. इतके यश तर बॉलीवूडच्या खानआघाडीलाही गेल्या वर्षी मिळवता आलेले नाही. पाठोपाठ ‘मिशन इम्पॉसिबल – फॉलोआऊट’ आणि ‘ज्युरासिक पार्क – फॉलन किंगडम’ या चित्रपटांनीही अनुक्रमे ७७ कोटी आणि ७२ कोटी रुपये कमाई करत हिट चित्रपटांचा मान मिळवला. सुपरहिरोपट, फ्रँचाईझी किंवा सिक्वलपट आणि लाइव्ह अ‍ॅक्शन -अ‍ॅनिमेशनपटांना आपल्याकडे चांगले यश मिळत आले आहे. या वर्षीही हॉलीवूडमध्ये प्रदर्शित होणाऱ्या फ्रँचाईझी आणि लाइव्ह अ‍ॅक्शनपटांची यादी मोठी असल्याने बॉलीवूडवर त्याचाही दबदबा या वेळीही राहणार असल्याचे चित्र दिसते आहे..

या वर्षी हॉलीवूड, बॉलीवूडसह जगभरातील प्रेक्षकांचे लक्ष अर्थातच एप्रिलमध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘अ‍ॅव्हेंजर्स – एंडगेम’ या चित्रपटाकडे लागले आहे. अ‍ॅव्हेंजर्सचा बहुप्रतीक्षित असा हा सिक्वल नेमका काय थरार घेऊन येणार याबद्दल प्रेक्षक उत्सुक आहेत. त्यामुळे हा चित्रपट मोठय़ा प्रमाणावर पाहिला जाणार यात शंका नाही. मात्र हा चित्रपट प्रदर्शित करण्याआधी ‘माव्‍‌र्हल युनिव्हर्स’मधील काही नवी मंडळी सिक्वलचा ताबा घेणार असल्याने त्यांची तोंडओळख करून देणारे नवीन सुपरहिरोपट एप्रिलच्या आधी प्रदर्शित होणार आहेत. ‘कॅप्टन माव्‍‌र्हल’ हा यातला महत्त्वाचा चित्रपट. माव्‍‌र्हल युनिव्हर्समधून कॅप्टन माव्‍‌र्हल ही नवीन व्यक्तिरेखा रुपेरी पडद्यावर येणार ही हवा गेल्या दोन वर्षांपासून होती. गेल्या वर्षीचा ‘अ‍ॅव्हेंजर्स इन्फिनिटी’ वॉर चित्रपट संपता संपता पुढच्या भागात कॅप्टन माव्‍‌र्हलची भूमिका महत्त्वाची असल्याचे सूतोवाच निर्मात्यांनी केलेले आहे. त्यामुळे कॅप्टन माव्‍‌र्हल कोण आणि तिचे काम हे कोडे उलगडणारा हा चित्रपट मार्च महिन्यात प्रदर्शित होईल. लगोलग एप्रिलमध्ये ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ आणि त्यानंतर जुलैमध्ये ‘स्पायडरमॅन फार फ्रॉम होम’ हा स्पायडरमॅन फ्रँचाईझी प्रेक्षकांसमोर येणार असल्याने या वर्षीच्या पूर्वार्धावर माव्‍‌र्हलचा प्रभाव राहणार यात शंका नाही.

‘मोगली’ हा लाइव्ह अ‍ॅक्शन चित्रपट यशस्वी ठरल्यानंतर आता एके काळी अ‍ॅनिमेशन अवतारात हिट झालेला ‘द लायन किंग’ही जुलैमध्येच लाइव्ह अ‍ॅक्शन रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘द लायन किंग’ हा अ‍ॅनिमेशनपट १९९४ साली प्रदर्शित झाला होता. आता तो पुन्हा नव्या रूपात येणार असल्याने त्याचे चाहते याही चित्रपटाकडे वळतील. अरेबियन नाइट्सच्या गोष्टीतला आत्तापर्यंत अ‍ॅनिमेशन रूपात भेटलेला अल्लादिनही लाइव्ह अ‍ॅक्शन अवतारात दिसणार आहे. गाय रिची दिग्दर्शित या हॉलीवूडपटात अभिनेता विल स्मिथ जीनीच्या भूमिकेत असणार आहे. एकीकडे लाइव्ह अ‍ॅक्शन चित्रपटांची पर्वणी, तर दुसरीकडे सिक्वलपटांचा सिलसिला अशी खाशी मेजवानी हॉलीवूडच्या चाहत्यांसाठी या वर्षी असणार आहे.

‘हाऊ टु ट्रेन युवर ड्रॅगन -द हिडन वर्ल्ड’, ‘द लेगो मुव्ही २’, ‘मेन इन ब्लॅक २’, ‘टॉय स्टोरी ४’ आणि सध्या प्रदर्शित झालेला ‘ट्रान्सफॉर्मर’ चित्रपट मालिकेतील सहावा भाग आणि ‘प्रीक्वल बम्बल बी’ हे सिक्वलपट या वर्षी औत्सुक्याचा भाग आहेत. हॉलीवूड अ‍ॅनिमेशनपटांचा एक मोठा प्रेक्षकवर्ग आपल्याकडे असल्याने हे अ‍ॅनिमेशन फ्रँचाईजी आपल्याकडे यशस्वी ठरणार यात शंका नाही. मे महिन्यात प्रदर्शित होणारा ‘गॉडझिला – किंग ऑफ  द मॉन्स्टर्स’ आणि त्याआधी एप्रिलच्या सुरुवातीला प्रदर्शित होणारा ‘हेलबॉय’ हे रिबूट पद्धतीनेच प्रेक्षकांसमोर येतील. हॉलीवूड सुपरस्टार मेल गिब्सन यांचा ‘व्हॉट वुमेन वाँट्स’ हा चित्रपट गाजला होता. या वर्षी त्याचाच वेगळा भाग म्हणून ‘व्हॉट मेन वाँट’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटांच्या निमित्ताने अनेक नवीन संकल्पना, जुने-नवीन हॉलीवूड कलाकार असा अनोखा मिलाफही प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

गेल्या वर्षी ‘अँटमॅन अँड द वास्प’, ‘डेडपूल २’ या माव्‍‌र्हलच्या फ्रँचाईझीपटांनी चांगले यश मिळवले होते. ५० ते ७० कोटी रुपयांच्या घरात या चित्रपटांनी कमाई केली होती. त्याचबरोबर ‘ब्लॅक पँथर’ या नव्या सुपरहिरोपटानेही ३८ कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला. एकीकडे ‘इन्क्रेडिबल्स २’सारख्या अ‍ॅनिमेशनपटांच्या फ्रँचाईझीनेही चांगली कमाई केली, तर ‘द नन’सारख्या हॉररपटानेही गल्ला जमवला. त्यामुळे या वर्षीही वेगवेगळ्या हॉलीवूडपटांना तसाच प्रतिसाद मिळेल, असा अंदाज वर्तवला जातो आहे.

First Published on January 13, 2019 12:32 am

Web Title: hollywood stars on the ticket counter