‘होम मिनिस्टर घरच्याघरी’च्या येणाऱ्या विशेष भागामध्ये मध्ये आदेश भावोजी करोनो योद्धांसोबत पैठणीचा खेळ खेळणार आहेत. हे ते योद्धे आहेत ज्यांनी स्वतःची किंवा कुटुंबीयांची काळजी न करता इतरांचा जीव वाचवण्यासाठी सतत झटत राहिले. त्यांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांना थोडासा आनंद देण्यासाठी झी मराठी आणि होम मिनिस्टर हा प्रयत्न करतेय.

करोना काळात जनतेची केलेली सेवा आणि कुटुंबीयांसोबत केलेली तडजोड हे या खास भागांमधून प्रेक्षकांसमोर उलगडणार आहेत. ‘होम मिनिस्टर घरच्याघरी’चे हे विशेष भाग २७ जुलै पासून संध्याकाळी ६.३० वा. प्रेक्षकांच्या भेटीला येतील.

महाराष्ट्रातील घराघरांत लोकप्रिय असलेला आणि ज्यात सहभागी व्हावे असे प्रत्येक महिलेचे स्वप्न असलेला कार्यक्रम म्हणजे ‘होम मिनिस्टर’. १३ सप्टेंबर २००४ रोजी ‘होम मिनिस्टर’चा पहिला भाग प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर आजतागायत या कार्यक्रमाची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम सादर करणारे सूत्रसंचालक आदेश बांदेकर यांची दुसरी ओळख ही ‘भावोजी’ अशीच झाली. आता लॉकडाउनमध्येही महिलांना पैठणीची साडी जिंकण्याची संधी घरबसल्या मिळत आहे.