वसंतराव देशपांडे संगीत सभेने माटुंगा येथील यशवंत नाटय़ मंदिरात आयोजित केलेल्या ‘होरी-चैती’ संगीत कार्यक्रमातून ‘गुरु-शिष्य’ परंपरेचे दर्शन उपस्थित श्रोत्यांना घडले. ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. चंद्रकांत लिमये यांच्यासह त्यांचे बारा शिष्य तसेच ज्येष्ठ शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर या संगीत मैफलीत सहभागी झाल्या होत्या.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्राची सुरुवात पं. लिमये यांच्या भूप रागातील ‘अबीर गुलाल ले आई’ या बंदिशीने झाली. त्यानंतर पं. लिमये यांच्या बारा शिष्यांनी एकाच वेळी एकाच सुरात ‘रसिया को नार बनावोरी’ ही रचना तसेच ‘तारी दे दे गारी’ हे लोकगीत सादर केले. ‘उडत अबीर गुलाल’ या होरीने पं. लिमये यांनी पहिल्या सत्राची सांगता केली.
दुसऱ्या सत्राची सुरुवात आरती अंकलीकर-टिकेकर यांनी भीमपलास रागातील ‘बीरजमें धूम’ या बंदीशीने केली. ‘रंग डारुंगी नंद के लालन पर’, ‘मोरे कान्हा जो’ या रचानाही त्यांनी सादर केल्या. ‘अवघा रंग एक झाला’ ने कार्यक्रमाची सांगता झाली.
अतुल ताडे (तबला), राज शिरोडकर (पखवाज), मकरंद कुंडले व मिलिंद कुलकर्णी, (हार्मोनिअम), राजेंद्र भावे (व्हायोलिन) यांनी संगीतसाथ केली. भाऊ मराठे यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. तर प्रारंभी पं. लिमये व अभिनेते उदय टिकेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.