प्रसाद कांबळी आणि भारत गणेशपुरे-सागर कारंडे यांच्यात तारखांवरून वाद
नाटकाचा निर्माता आणि नाटकातील कलाकार यांच्यात नाटय़प्रयोगाच्या तारखा आणि मालिका व चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी दिलेल्या तारखांवरुन वाद होत असतातच. गडकरी रंगायतन येथे रविवारी झालेल्या ‘जस्ट हलकं फुलकं’ या नाटकाच्या प्रयोगाच्या वेळीही निर्माते प्रसाद कांबळी आणि नाटकातील मुख्य कलाकार भारत गणेशपुरे व सागर कारंडे यांच्यात ‘तू तू म म’ झाले. या ‘जस्ट हलकं फुलकं’ भांडणाची चर्चा सध्या नाटय़सृष्टीत सुरू असून नाटकाबाबतीत काही कठोर निर्णय घेण्यात येणार असल्याची शक्यताही व्यक्त होते आहे.
नाटकातील लोकप्रिय कलाकार दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका किंवा चित्रपटात काम करतात. तर मालिकांमधून लोकप्रिय झालेले कलाकार नाटकात काम करतात. कधीकधी कलाकार वैयक्तिक ‘शो’ (कार्यक्रम) घेतात. यामुळे चित्रीकरण, नाट्य प्रयोग व ‘शो’च्या तारखांचा घोळ होतोच. गडकरी रंगायतनच्या ‘जस्ट हलकं फुलकं’च्या प्रयोगाच्या वेळीही असाच घोळ घडला. त्यामुळे निर्माते प्रसाद कांबळी आणि भारत गणेशपुरे-सागर कारंडे यांच्यात तारखांवरुन जोरदार खडाजंगी झाली. या कलाकारांचा सध्या एका खासगी वाहिनीवर कार्यक्रम सुरू आहे. त्याशिवाय त्यांचे अन्य शो आणि नाटय़प्रयोगांच्या तारखा जुळत नसल्यामुळे हा वाद झाला. रविवारी गडकरी रंगायतनमध्ये नाटकाचा २३४ वा प्रयोग रंगला होता. मात्र आता या तिघांमधील भांडणाचा परिणाम नाटकावर होणार असल्याची चर्चा सुरू आहे.

तारखांवरुन नाटय़सृष्टीत वाद होतातच. नाटक हे ‘टीमवर्क’ असून नाटकाशी संबंधित प्रत्येकाने शिस्त पाळणे गरजेचे आहे. शिस्तीचे पालन न करणाऱ्यांना वेळोवेळी संधीही दिलेली आहे. मात्र एका मर्यादेच्या पलिकडे गेल्यानंतर काही कठोर निर्णय घ्यावे लागतात.
-प्रसाद कांबळी, निर्माते ‘जस्ट हलकं फुलकं’ (भद्रकाली प्रॉडक्शन)

गडकरी रंगायतनमधील प्रयोगाच्या वेळी निर्माते आणि आमच्यात तारखांवरुन वाद झाला ही गोष्ट खरी आहे. असे वाद नविन नसले तरी त्यामुळे नेमके काय होईल ते आत्ताच सांगता येणार नाही.
-सागर कारंडे (कलाकार)