अभिनेता हृतिक रोशन जवळपास दोन वर्षांच्या ब्रेकनंतर ‘सुपर ३०’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र या चित्रपटाचं प्रदर्शन गेल्या वर्षभरापासून रखडलं आहे. हा चित्रपट कंगनाच्या ‘मणिकर्णिका’सोबत २५ जानेवारीला प्रदर्शित होणार होता. मात्र गेल्या महिन्याभरात या चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे हृतिकच्या चाहत्यांच्या नशीबी प्रतीक्षा करण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता. अखेर ‘रिलायन्स एंटरटेनमेंट’नं ‘सुपर ३०’ च्या प्रदर्शनाबद्दल खुलासा केला आहे.

चित्रपटाचं काही काम बाकी आहे त्यामुळे प्रदर्शनास दिरंगाई होत असल्याची माहिती रिलायन्स एंटरटेनमेंटकडून देण्यात आली आहे. त्यामुळे हा चित्रपट आता २६ जुलै २०१९ मध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक विकास बहलवर ‘मी टू’ मोहिमेअंतर्गत अनेक महिलांनी लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते.  विकासवरील आरोपानंतर हृतिकनं त्याच्यासोबत काम न करण्याचा निर्णयही घेतला होता. त्यामुळे काही काळ चित्रपटाचं शुटींग लांबलं होतं. तसेच या चित्रपटात अनेक नवीन दृश्यांचा ऐनवेळी समावेश करण्यात आला त्यामुळेही चित्रीकरणास विलंब झाला.

हा चित्रपट नोव्हेंबर २०१८ मध्ये प्रदर्शित होणार होता त्यानंतर निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख बदलून ती २५ जानेवारी २०१९ केली होती मात्र तोपर्यंतही चित्रपटाचं काम पूर्ण न झाल्यानं अखेर ‘सुपर ३०’ ला जुलै महिन्यात प्रदर्शनाचा मुहूर्त सापडला आहे. आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असणार आहे.