अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या त्यांच्या आगामी ‘सुपर ३०’ चित्रपटाच्या प्रमोशन्समध्ये व्यस्त आहेत. हा चित्रपट १२ जुलै २०१९ रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद आहे. आनंद कुमार यांची भूमिका हृतिकने योग्यप्रकारे साकारली असून मृणालनेही ‘सुप्रिया’च्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे असे सांगण्यात येत आहे.
‘कुमकुम भाग्य’ या टीव्ही मालिकेने मृणालला प्रसिद्धी मिळवून दिली. हृतिकसोबत काम करण्याविषयी तिला विचारले असता ती म्हणाली की, “ऑडिशन झाल्यानंतर जवळपास चार महिने मला माहीतंच नव्हतं की, या चित्रपटात प्रमुख भूमिकेत हृतिक दिसणार आहे. माझ्यासाठी तो क्षण ‘इक पल का जीना’ असा होता. प्रत्यक्ष ग्रीक गॉडसोबत काम करण्यापेक्षा चांगलं काहीच असू शकत नाही. हृतिकसोबत काम करून माझा आत्मविश्वास वाढला.”
“या भूमिकेसाठी मी अनेक बिहारी चित्रपट बघितले. मला उच्चारांवर काम करणे गरजेचे होते. मी स्वतः हृतिकची खूप मोठी फॅन आहे. आम्ही वाराणसीतल्या घाटावर एक सीन शूट करत असताना मला हृतिकऐवजी स्वतः आनंदजीच सीन करत आहेत असा भास झाला.”असंही ती म्हणाली.
तब्बल दोन वर्षांनंतर हृतिक रोशन ‘सुपर ३०’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. कोणताही आधार नसलेली मुलंसुद्धा देशातील बुद्धिमान व्यक्तिमत्त्वांपैकी एक होऊ शकतात हे सिद्ध करण्यासाठी झटणाऱ्या आनंद कुमार यांचा जीवनप्रवास या चित्रपटात दिसणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 2, 2019 2:05 pm