एलिजाबेथ हर्लेचा पूर्वीश्रमीचा प्रियकर प्रसिद्ध अभिनेता ह्यू ग्रांटने वयाच्या ५७ व्या वर्षी लग्न केले आहे. ह्यूने त्याची स्वीडिश प्रेयसी एना एबरस्टीनशी विवाह केला. ह्यूचे हे पहिले लग्न आहे. एना ३९ वर्षांची आहे. रिपोर्टनुसार, शुक्रवारी एका छोटेखानी समारंभात दोघांनी लग्न केले.
लग्नात ह्यू ने ब्ल्यू सूट घातला होता. तर एनाने पाऊडर ब्ल्यू शर्ट, व्हाइट स्कर्ट आणि त्यावर ब्लॅक बेल्ट घातला होता. एनाने गोल्ड बँड आणि ह्यू ने मोठी रिंग घातली होती, ज्यात तीन लाल रंगाचे खडे होते. लग्नानंतर नवदाम्पत्य एनाचे आई- वडिल आणि दोन भाऊ तसेच ह्यूचा भाऊ आणि त्याची दोन मुलं एका अज्ञात ठिकाणी सेलिब्रेशनसाठी गेले.

ह्यूच्या लग्नाची बातमी त्याच्या जवळच्या मित्रांनाही माहित नव्हती. त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्या लग्नाची बातमी कळली तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण ह्यूचा लग्नपद्धतीवर विश्वास नव्हता. त्याच्या मते, कोणताही माणूस ४० वर्षांच्या प्रामाणिक नात्यासाठी बनलेला नाही. एनासोबत लग्न होण्याआधी ह्यू एलिजाबेथ हर्ले, जेमिना खान आणि तिंगलन गॉन्ग यांच्यासोबत नात्यात होता.