आपल्या तापट स्वभावासाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते ऋषी कपूर नेहमीच त्यांच्या बेधडक ट्विटमुळे चर्चेत येतात. वेगवेगळ्या विषयांवरुन त्यांनी केलेल्या ट्विट्समुळे अनेकदा वादही निर्माण झाले. आता पुन्हा एकदा ते सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. याचं कारण म्हणजे त्यांनी ट्विटरवर एका महिलेला ‘थेट मेसेज’मध्ये अपशब्द म्हटले. त्या महिलेनंही मेसेजचा स्क्रिनशॉट पोस्ट करत ऋषी कपूर यांना ट्रोल केलं. या ट्रोलमुळे त्यांचा पुन्हा एकदा राग अनावर झाला आहे.

या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात ऋषी कपूर यांनी एका ट्विटर युजरला पाठवलेल्या मेसेजवरुन झाली. ट्विटरवरील डायरेक्ट मेसेज पर्यायाद्वारे त्यांनी त्या युजरला अपशब्द पाठवले. @DardEdiscourse या युजरनेही त्या मेसेजचा स्क्रिनशॉट काढत ट्विटरवर शेअर केला. इतकंच नव्हे तर त्यांच्या २०१३च्या ‘बेशरम’ या चित्रपटाचा एक फोटो पोस्ट करत त्या युजरने खिल्ली उडवली. यानंतर सोशल मीडियावर ऋषी कपूर यांना ट्रोल केलं गेलं. यावर आता उत्तर देत ऋषी कपूर यांनी पुन्हा एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं की, ‘मूर्ख! मी आता हे सर्व ट्विट पाहिले आणि मी काही साधूसंत नाही. तुमच्या भाषेतच मी जशास तसं उत्तर देणार. त्यामुळे टीका करणं बंद करा.’

काही दिवसांपूर्वी ऋषी कपूर यांच्या निशाण्यावर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी होते. राहुल यांच्या या भाषणातील काही मुद्दे ऋषी यांना पटले नाही आणि त्यांनी आपला राग ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला होता. शिवाय नेहा धुपियाच्या शोमध्येही त्यांनी तरुण पिढीच्या कलाकारांवर घणाघाती टीका केली होती.