शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारत आहे. बाळासाहेबांसारख्या प्रभावी नेत्याची भूमिका रुपेरी पडद्यावर नवाजुद्दीन साकारणार हे कळताच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अगदी या भूमिकेसाठी अभिनेता अजय देवगण याचंही नाव चर्चेत होतं. गेल्यावर्षी रामलीलेत नवाजुद्दीनला भूमिका साकारायला शिवसेनेनं विरोध केला असल्याच्या चर्चा होत्या तर दुसरीकडे बाळासाहेबांची भूमिका साकारण्याचं शिवधनुष्य नवाजुद्दीनच्या हातात देणं हा तितकाच मोठा विरोधाभास असल्यानं त्याच्या निवडीबाबत तितकंच कुतूहल अनेकांच्या मनात होतं.

‘द इंडियन एक्स्प्रेस’ला नवाजुद्दीनने दिलेल्या मुलाखतीत त्यांनी शिवसेनेचे आभार मानले, तसेच रामलीलेच्या वेळेस शिवसेनेने आपल्याला विरोध केला नसल्याचंही नवाजुद्दीन स्पष्ट केलं. माध्यामांनी चुकीच्या पद्धतीनं ही बातमी दाखवली. संबधीत व्यक्ती ही शिवसेनेतली नव्हती, उद्या कोणाही उठून मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे असं म्हणेल. त्यामुळे रामलीलेतील माझ्या सहभागावर शिवसेनेनं आक्षेप घेतला ही बातमी पुर्णपणे चुकीची आहे. संबधित व्यक्ती रामलीला बंद पाडण्याची धमकी देत असल्यानं मी ते सादर न करण्याचा निर्णय घेतला असं तो म्हणाला.
‘बाळासाहेबांची भूमिका साकरण्याची संधी मला शिवसेनेनं दिली, त्यांनी मला निवडल्यानं मी शिवसेनेचे आभार मानतो. त्यांनी माझी निवड केली हीच सर्वात मोठी गोष्ट आहे. मीच काय जगातील कोणताही अभिनेता असता तरी त्यानं ही संधी सोडली नसती ‘ अशीही प्रतिक्रिया त्यानं दिली.

नवाजुद्दीनची निवड झाल्यानंतर त्यांच्या एकंदर मराठी बोलण्यावरदेखील शंका उपस्थित केल्या होत्या. पण, टीझर लाँचिगच्यावेळीच बाळासाहेब ठाकरेच मला मराठी बोलण्याची प्रेरणा देतील, आशीर्वाद देतील आणि त्यांची लाडकी भाषा मराठी माझ्यावर तेवढंच प्रेम करेल.’ असं म्हणत सगळ्यांच्या शंकेचं निरसन त्यानं केलं होतं.