करणच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये नुकतीच सैफ अली खान आणि त्याची मुलगी सारानं उपस्थिती लावली. या शोदरम्यान साराने करिनाला छोटी माँ म्हटलं तर आवाडणार नाही असं म्हटलं होतं. त्यानंतर एका मुलाखतीमध्ये करिनानेदेखील सावत्र मुलं सारा अली खान आणि इब्राहम खान यांच्याशी असलेल्या नात्यावर भाष्य केलं आहे. सारा आणि इब्राहम यांची मी कधी आई होऊ शकत नाही असं ती म्हणाली आहे.

सारा लवकरच केदारनाथ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यामुळे करिना अनेक वेळा साराला बॉलिवूडमध्ये कसं वावरावं याविषयी सल्ले देत असल्याचं दिसून येतं. विशेष म्हणजे सारा आणि करिनामध्ये सावत्र नातं असूनही त्या मैत्रिणीप्रमाणे वावरत असतात. ‘सारा आणि अब्राहम यांची मी चांगली मैत्रिणी होऊ शकते पण आई होणं मला जमणार नाही. त्यांना जेव्हा माझी मदत लागेल तेव्हा मी कायम हजर असेन, असं मी सैफला लग्नाच्या पहिल्याच दिवशी सांगितलं होतं’, असं करिना म्हणाली.

पुढे ती असंही म्हणाली, ‘त्यांच्याकडे अमृतासारखी चांगली आई आहे. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या आईची गरज नाहीये. याच कारणामुळे मी त्यांची आई होऊ शकत नाही. पण एक चांगली मैत्रिणी कायम असेन’.

दरम्यान, सारा आणि करिना यांच्यात चांगलं बॉण्डींग असून अनेक वेळा त्या एकमेकींबद्दल बोलताना दिसतात. करिना एक प्रोफेशनल लेडी आहे. त्यामुळे तिच्याकडून प्रोफेशनलिझ्म शिकायला आवडेल असं काही दिवसापूर्वी सारा म्हणाली होती.