२०१६ हे वर्ष भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांसाठी तणावाचंच होतं ही बाब नाकारता येणार नाही. उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही देशांतर्गत व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाले. याचा सर्वात जास्त फटका बसला तो म्हणजे कलाकारांना. पाकिस्तानी कलाकारांना भारतात बंदी घातल्यानंतर निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाच्या प्रदर्शनात बऱ्याच अडचणी आल्या होत्या. करणच्या चित्रपटामध्ये पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचीही भूमिका असल्यामुळे त्याला या सर्व अडचणींना तोंड द्यावे लागले होते. दरम्यान, आपल्या चित्रपटामध्ये पाकिस्तानी कलाकाराला काम दिल्यामुळे करणने माफी मागणारा एक व्हिडिओही प्रसिद्ध केला होता. याच व्हिडिओविषयी सांगताना करणने एका मुलाखतीमध्ये त्याचे मत मांडले आहे.

सीएनएन न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये करणच्या माफीनाम्याच्या व्हिडिओविषयी विचारले असता तो म्हणाला, त्यावेळी मी परिस्थिती आणि विचारांमध्ये गुंतलो होतो. सदर प्रसकरणी माझेही काही विचार आहेतच. पण, त्यावेळी माझ्या स्टुडिओचा आणि चित्रपटातील कलाकारांचा प्रश्न होता. त्यामुळे मी माफी मागणारा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला खरा पण, हे सर्व काही भयंकर होते. कॅमेरासमोर बसून मला माझी देशभक्ती सिद्ध करावी लागते हे किती दुर्दैवी आहे, असे करण म्हणाला. याविषयी मुलाखतीमध्ये करणने त्याचे स्पष्ट विचार मांडले. माझ्या कारकिर्दीच्या माध्यमातून मी गेल्या २० वर्षांपासून या देशाची सेवा करत आहे, असेही करण या मुलाखतीमध्ये म्हणाला.

दरम्यान, उरी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानविरोधात असंतोष असून पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करु देऊ नका अशी भूमिका राजकीय पक्षांनी मांडली होती. मनसेनेही पाकिस्तानी कलाकार असलेले चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. ‘ऐ दिल है मुश्कील’ चित्रपटामध्ये पाकिस्तानी अभिनेता फवाद खानने काम केले असल्यामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन होऊ देणार नाही अन्यथा फटाके फुटतील असा इशारा मनसेने दिला होता. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर करण जोहरने अखेर मौन सोडत एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता.

करण जोहरने या व्हिडीओच्या माध्यमातून त्याची भूमिका मांडली होती. ‘माझ्यासाठी देश महत्त्वाचा आहे. प्रेम वाटणे हीच खरी देशभक्ती असल्याचे माझे मत आहे. माझ्या कामातून आणि चित्रपटांमधूनही हाच प्रयत्न केला’, असे करणने त्या व्हिडिओमधून सांगितले होते. ‘काही लोकांमुळे या सर्वांना त्रास देणे योग्य नाही असे करणने म्हटले आहे. दहशतवाद कोणताही असो, विशेषतः त्याचा माझ्या देशातील नागरिकांवर परिणाम होत असेल तर मी त्याचा निषेध करतो’, असेही त्याने स्पष्ट केले होते.