स्वेच्छा मरणासंदर्भात सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी ऐतिहासिक निर्णय दिला. मरणासन्न अवस्थेत असलेल्यांना मृत्यूपत्र तयार करण्याची अखेर कोर्टाने परवानगी  दिली आहे. मात्र त्यासोबतच काही अटी- शर्तीसुद्धा ठेवल्या आहेत. या निर्णयामुळे मरणासन्न अवस्थेत असणाऱ्यांना स्वेच्छा मरणाची परवानगी मिळणार आहे. स्वेच्छा मरणाच्या विषयावर आधारित दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी ‘गुजारिश’ या चित्रपटाची निर्मिती २०१० मध्ये केली होती. स्वेच्छा मरणासंदर्भात आजवर जितके वादविवाद झाले, तशाचप्रकारे या चित्रपटाच्या वेळीदेखील झाले होते. मरणासन्न अवस्थेत असलेल्यांची व्यस्था चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला असता त्यावेळी अनेकांनी आगपाखड केली होती, अशी प्रतिक्रिया भन्साळींनी कोर्टाच्या निर्णयानंतर दिली.

‘मला अजूनही तेव्हाची परिस्थिती आठवते, जेव्हा माझ्या चित्रपटाच्या विषयावर अनेकांनी टीका केल्या होत्या. माझ्या जवळच्या एका व्यक्तीच्या जीवनावर आधारित तो चित्रपट होता. वेदना, दु:ख या गोष्टी मला ठाऊक नाहीत अशातला भाग नाही. पण त्या व्यक्तीचा त्रासदायक प्रवास, त्याच्या वेदना या मला शब्दांतही सांगता येणार नाहीत. आयुष्यात एक अशी परिस्थिती निर्माण होते, जेव्हा पूर्णविराम देणं हा एकमेव पर्याय किंवा उपाय शिल्लक राहतो, हे मला त्यावेळी जाणवलं होतं,’ असं ते म्हणाले.

स्वेच्छा मरणासंदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय समाधानकरक नाही-लवाटे दाम्पत्य

‘गुजारिश’मध्ये मरणासन्न अवस्थेत असलेल्या एका व्यक्तीची व्यथा मांडण्यात आली आहे. स्वेच्छा मरणाची तो मागणी करत असतो आणि हा लढा जिंकण्यात तो यशस्वी ठरतो. यामध्ये हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय बच्चनने मुख्य भूमिका साकारल्या होत्या.