गेल्या वर्षभरापासून बॉलिवूडमध्ये बायोपिकचा ट्रेंड सुरु झाला आहे. कलाविश्वापासून ते क्रीडाक्षेत्रापर्यंत अनेक दिग्गज व्यक्तींच्या जीवनावर आधारित चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. संजय दत्त असेल किंवा क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांच्या बायोपिकनंतर ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी यांच्या बायोपिकविषयी कलाविश्वात चर्चा रंगली. या चर्चांवर अरुणा इराणी यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. त्यासोबतच त्यांच्या बायोपिकला अभिनेत्री आलिया भट्ट योग्य न्याय देऊ शकेल असेही त्या म्हणाल्या.

‘चढती जवानी मेरी’ किंवा ‘दिलबर दिलसे प्यारे’ म्हणत प्रेक्षकांवर आपला ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी यांनी आतापर्यंत अनेक भूमिका वठविल्या आहेत. नायिका, खलनायिका, चरित्र अभिनेत्री अशा विविध भूमिकांमधून बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या अरुणा इराणी यांनी कलाविश्वात प्रदीर्घकाळ प्रवास केला आहे. त्यामुळे त्यांचा जीवनप्रवास चाहत्यांसमोर यावा यासाठी काही दिग्दर्शक प्रयत्नशील आहेत.

‘सध्या पाहायला गेलं तर अनेक दिग्गज व्यक्तींच्या जीवनावर आधारित बायोपिकची निर्मिती होत आहे. मात्र या बायोपिकमध्ये त्या व्यक्तींची केवळ सकारात्मक किंवा चांगलीच बाजू दाखविली जाते. मला असं वाटतं की जर त्या व्यक्तीचा तुम्ही जीवनप्रवास मांडत आहात तर त्यांच्या चांगल्या बाजूसोबतच त्याची वाईट बाजूही जगासमोर दाखविली गेली पाहिजे. मात्र असं होतांना दिसत नाही’, असं अरुणा इराणी म्हणाल्या.

पुढे त्या असंही म्हणाल्या, ‘माझ्या बायोपिकची निर्मिती व्हावी असं अनेक फिल्ममेकर्सला वाटत आहे. यासंदर्भात त्यांनी माझी भेटही घेतली आहे. जर कधी माझा बायोपिक आलाच तर त्यामध्ये माझी भूमिका आलिया भट्टने करावी. ती उत्तम अभिनेत्री असून या भूमिकेला ती न्याय देऊ शकेल. तसंच माझ्या बायोपिकमध्ये माझी चांगली आणि वाईट अशा दोन्ही बाजू मांडलेल्या असाव्यात’.

अरुणा इराणी गेल्या अनेक वर्षापासून बॉलिवूडमध्ये कार्यरत असून त्यांनी आतापर्यंत ३०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सध्या त्या छोट्या पडद्यावरील ‘दिल तो हॅप्पी है जी’ या मालिकेत काम करत आहेत. या मालिकेमध्ये त्या आजीची भूमिका वठवत आहेत.