अभिनेत्री जान्हवी कपूरची मुख्य भूमिका असणारा ‘गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल’ १२ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मात्र दुसरीकडे या चित्रपटावरुन नवीन वाद सुरु झाला आहे. भारतीय वायूसेनेने या चित्रपटामधील काही दृष्यांवर आक्षेप घेतला असून त्यासंदर्भातील पत्रही वायूसेनेने सेन्सॉर बोर्डाला तसेच निर्माते धर्मा प्रोडक्शन आणि नेटफ्लिक्सला पाठवले आहे. या चित्रपटामध्ये भारतीय वायूसेनेचे चुकीची प्रतिमा साकारण्यात आल्याचे वायूसेनेनं म्हटलं आहे. आता गुंजन सक्सेना यांच्या सहकारी राहिलेल्या निवृत्त विंग कमांडर नम्रता चंदी यांनी चित्रपटाचा निर्माता असणाऱ्या करण जोहरवर खोटी माहिती पसरवण्याचा आरोप केला आहे. या चित्रपटासंदर्भात चंदी यांनी आउटलूकमध्ये या चित्रपटासंदर्भात भाष्य करणारं पत्र लिहिलं असून त्यामधूनच त्यांनी ही टीका केली आहे.

मला कधीच तसा अनुभव आला नाही

“मी स्वत: वायूसेनेमध्ये हेलिकॉप्टर पायलट होती. ज्या प्रकारे चित्रपटामध्ये दाखवण्यात आलं आहे त्या प्रकारच्या शोषणाचा किंवा भेदभाव केल्याचा अनुभव मला कधीच आला नाही. मला वाटतं युनिफॉर्ममधील माणसं ही प्रोफेश्नल आणि जंटलमन आहेत. सुरुवातीला मला नक्की त्रास झाला. महिलांसाठी कपडे बदलण्याची स्वतंत्र चेंजिंग रुम नव्हती, स्वतंत्र शौचालयही नव्हती. मात्र असं असलं तरी पुरुष अधिकाऱ्यांनी आमच्यासाठी स्पेस निर्माण केली. मी कपडे बदलताना अनेकदा तिथे कोणी येऊ नये म्हणून काही अधिकारी सुरक्षा म्हणून काही अंतरावर उभे राहून कोणी तेथे येणार नाही याची काळजी घ्यायचे. १५ वर्षांच्या करियरमध्ये ना कधी माझा अपमान झाला न कधी मला चुकीची वागणूक मिळाली,” असं चंदी यांनी या लेखात म्हटलं आहे. यामध्ये चंदी यांनी गुंजन आणि मी एकत्रच प्रशिक्षण घेतल्याचेही नमूद केलं आहे.

खोटी माहिती दिली जातेय

चित्रपटाच्या निर्मात्यांकडून खोटी माहिती पसरवली जात असल्याचेही चंदी यांनी म्हटलं आहे. “कारगिलमध्ये विमान उडवणारी पहिली महिला वैमानिक ही गुंजन नसून श्रीविद्या आहेत. मात्र श्रीविद्या यांच्याकडून हे क्रेडीट काढून घेतल्याबद्दल त्यांची काही तक्रार नसेल याची मला खात्री आहे,” असं चंदी यांनी लेखात म्हटलं आहे. “पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमा भागाजवळ विमान उडवणीर मी पहिली महिला वैमानिक आहे. ही १९९६ ची गोष्ट आहे. माझ्याबरोबर क्रू रुममध्ये असणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्यावर माझा विश्वास होता. लेहमध्ये पोस्टींग झालेली मी पहिली महिला वैमानिक होते. सियाचिन ग्लेशियरमध्ये मी चित्ता हेलिकॉप्टर उडवलं होतं.”

जान्हवीला सल्ला

महिलांना वायूसेनेमध्ये जाताना अडचणी येतात असं दाखवणारा हा चित्रपट असून या चित्रपटातील काही प्रसंग ज्या पद्धतीने दाखवण्यात आले आहेत ते पाहून माझ्याबरोबरच्या महिला अधिकाऱ्यांना वाईट वाटलं असून धक्काही बसला असल्याचे चंदी यांनी म्हटलं आहे. “जर तुला भारतीय महिला असल्याचा अभिमान वाटत असेल तर मला तुला एक सल्ला द्यायचा आहे. या पुढे अशाप्रकारचे चित्रपट करु नकोस. भारतातील प्रोफेशनल महिला आणि पुरुषांची अशाप्रकारची नकारात्मक प्रतिमा निर्माण करु नका,” असा खोचक सल्ला चंदी यांनी जान्हवीला दिला आहे.