अभिनेत्री जान्हवी कपूरचा ‘गुंजन सक्सेना – द कारगिल गर्ल’ हा चित्रपट आज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. कारगिल युद्धात पराक्रम गाजवणाऱ्या फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाची निर्मिती करण जोहरने केली आहे. मात्र प्रदर्शनाच्या दिवशीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटातील काही दृष्यांवर भारतीय हवाईदलाने आक्षेप नोंदवला आहे. यासंदर्भातील पत्र सेन्सॉर बोर्ड, चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या करण जोहरची धर्मा प्रोडक्शन कंपनी आणि चित्रपट ज्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन प्रदर्शित होत आहे त्या नेटफ्लिक्सला पाठवण्यात आलं आहे. या पत्रामध्ये चित्रपटांमधी काही दृष्यांबद्दल आक्षेप नोंदवण्यात आल्याचं एएनआय या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.

कारगिल युद्धात गुंजन सक्सेना यांनी फ्लाईट लेफ्टनंट श्रीविद्या राजनसोबत लढाऊ विमान उडवलं होतं. लढाऊ विमान उडवणाऱ्या त्या भारतातील पहिल्या महिला ठरल्या होत्या. दरम्यान युद्धात पाकिस्तानी सैन्यदलाकडून भारतीय सैनिकांवर निशाणा साधण्यात येत होता. त्या भागातूनच गुंजन यांनी लढाऊ विमान उडवत सैन्यदलातील जवानांना सुरक्षितरित्या बाहेर काढलं होतं. त्यांच्या या साहसाची कथा या चित्रपटामध्ये दाखवण्यात येणार आहे. मात्र या चित्रपटातील काही दृष्यांवर आता भारतीय हवाई दलाने आक्षेप नोंदवला आहे. भारतीय हवाईदलाने धर्मा प्रोडक्शन, नेटफ्लिक्स आणि सेन्सॉर बोर्डाला पत्र लिहून या चित्रपटातील काही दृष्यांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ‘गुंजन सक्सेना – द कारगिल गर्ल’ चित्रपटामध्ये भारतीय हवाई दलाची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

“भारतीय हवाईदलाच्या अधिकाऱ्यांनी अभ्रिप्राय देण्यासाठी पाठवण्यात आलेल्या चित्रपट पहिल्यानंतर या चित्रपटातील काही दृष्य, संवाद आणि ट्रेलरमधील काही भाग भारतीय हवाई दलाची नकारात्मक प्रतिमा तयार करत असल्याचे निर्दर्शनास आलं आहे. चित्रटातील मुख्य पात्राचे म्हणजेच फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांचे महत्व वाढवून दाखवण्यासाठी धर्मा प्रोडक्शनने काही घटना चुकीच्या पद्धतीने दाखवल्या आहेत. भारतीय हवाई दलामध्ये महिलांना देण्यात येणाऱ्या वागणूकीबद्दल चुकीचा संदेश यामध्यमातून दिला जात आहे,” असं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

या चित्रपटात जान्हवी कपूर सोबतच पंकज त्रिपाठी, अंगद बेदी, विनीता कुमार आणि मानव विज हे कलाकारही दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शरण शर्मा करत आहेत. अंगद चित्रपटात जान्हवीच्या भावाच्या भूमिकेत दिसणार आहे. नेटफ्लिक्सने या चित्रपटाचे हक्क ५० कोटींना विकत घेतले आहेत.