भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कमालीचे ताणले गेले असून दोन्ही देशांनी चर्चेने प्रश्न सोडवावा असा सल्ला अनेक देशांनी भारत आणि पाकिस्तानला दिला आहे. असे असतानाच भारत आणि पाकिस्तानमधील अनेकांनी शांततेचा मार्ग अवलंबण्याची मागणी केली आहे. सिनेक्षेत्रातील अनेक व्यक्तींनी पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय हवाई दलाचे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना सुखरुप परत आणण्यासंदर्भात ट्विट केले आहेत. तर दुसरीकडे अभिनेत्री रिचा चड्ढाने राजकारण्यांना ट्विटवरुन काही प्रश्न विचारले आहेत.

रिचा चड्ढाने भाजपा नेते बी. एस. येडियुरप्पांवर त्यांच्या वक्तव्यावरुन टिका केली आहे. त्यानंतर तिने केलेल्या ट्विटमध्ये भारतीय राजकारण्यांना काही प्रश्न विचारले आहेत. एकीकडे भारत पाकिस्तानमधील संबंध इतके टोकाला गेले असताना देशातील अनेक राजकारणी प्रचारसभांमध्ये व्यस्त आहेत असा टोला रिचाने लगावला आहे. आपल्या ट्विटमध्ये रिचा म्हणते, ‘सगळेच जण प्रचारसभांमध्ये व्यस्त आहेत तर देशाचे नेतृत्व कोणाच्या हाती आहे? सिमेवर तणावाची परिस्थिती आहे. तीन राज्यांमधील विमानतळांवरील उड्डाणे थांबवण्यात आली आहेत. अभिनंद वर्थमान यांच्या सुटकेसंदर्भात कोण चर्चा करत आहे? शांततेच्या चर्चांमध्ये कोण सहभागी होत आहे? काय विचित्र परिस्थिती आहे. देशाचा मालक कोण (आहे काही कळत नाही.) खूप भयंकर आहे हे.’

या ट्विटवरुन अनेकांनी रिचाला ट्रोल केले. मात्र रिचाने ट्रोलर्सचाही चांगलाच समाचार पुढच्या ट्विटमध्ये घेतला. तिने एक स्क्रीनशॉर्ट शेअर करत ट्रोलर्सला सुनावले आहे. क्षितीज श्रीवास्तव नावाच्या एका व्यक्तीने रिचाला नागरिक शास्त्राचा अभ्यास केला असता तर या सर्वांची उत्तरे मिळाली असती असं सांगतानाच अभिनयावर लक्ष देण्याचा सल्ला दिला. रिचाने या ट्विटचे स्क्रीनशॉर्ट शेअर करत ट्रोलर्सला टोमणा लगावला. ‘तुला एकच सांगेल तू पंधरा लाख मागत राहा. कारण ते मिळाल्यावर तुला दिवसभर एका ट्विटसाठी दहा रुपये दराने ट्विट करावे लागणार नाही,’ असा टोला रिचाने लगावला आहे.

रिचाने विचारलेला प्रश्नांवर अनेकांनी तिला पाठिंबा दर्शवला असून कोणीतरी प्रश्न उपस्थित करत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. तर तिने ट्रोलर्सला दिलेल्या उत्तरावरही अनेकांनी रिचाला बरं झालं चांगला समाचार घेतला ट्रोलर्सचा अशा आशयाची उत्तरे काही युझर्सने दिली आहेत.