काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री पायल घोषने प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपवर गैरवर्तनाचा आरोप केला. अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केले असून मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली आहे असे ट्विट पायलने केले होते. आता पायलने आणखी एक ट्विट केले असून या ट्विटमध्ये तिने जर मी छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर ती आत्महत्या नसेल असे म्हटले आहे.

पायलचे हे ट्विट सध्या चर्चेत आहे. ‘मी अनुराग कश्यपशी संबंधीत एका पोर्टलला मुलाखत दिली होती. पण नंतर मला समजले की ते पोर्टल यासाठी अनुरागची परवानगी घेत आहेत. मी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे मी आत्महत्या केलेली नसेल’ या आशयाचे ट्विट पायलने केले आहे.

आणखी वाचा: ‘जर अनुराग दोषी असेल तर…’, तापसी पन्नूचे मोठे विधान

अनुराग कश्यपने लैंगिक शोषण केल्याचा आरोप पायलने केला. त्यानंतर आता तिने मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात अनुराग विरोधात एफआयआर दाखल केला आहे. पायलचे वकील नितीन सातपुते यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. बलात्कार, गैरवर्तन आणि चुकीचे कृत्य केल्याप्रकरणी कलम ३७६,३५४,३४१ आणि ३४२ अंतर्गत अनुराग कश्यपविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पायल घोषने केलेला आरोप
“अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केलं असून मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली आहे. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा, ज्यामुळे या माणसाचं खरं रुप समोर येईल. मला माहित आहे यामुळे मला धोका असून माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृपया माझी मदत करा”, असे ट्विट पायलने केले होते.