बॉलिवूड दिग्दर्शक, निर्माता राकेश रोशन यांचा काबिल हा सिनेमा बुधवारी पाकिस्तानमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. पाकिस्तानमध्येही या सिनेमाला चांगली पसंती मिळत आहे. त्यामुळे राकेश यांचे म्हणणे आहे की, पाकिस्तानमध्ये भारतीय सिनेमांसाठीची दारं पुन्हा एकदा उघडली गेली आहेत. त्यामुळे आता भारतीयांनीही या दिशेने पुढे गेले पाहिजे. गेल्यावर्षी १८ सप्टेंबरला उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधले तणाव वाढले होते. ज्यामुळे दोन्ही देशातले व्यवहार तातडीने बंद करण्यात आले होते. त्यात मनोरंजन क्षेत्राचाही समावेश होता.

पाकिस्तानात काबिल सिनेमाच्या प्रदर्शनामुळे अनेक सकारात्मक गोष्टी भविष्यात होऊ शकतात असे वाटू लागले आहे. राकेश रोशन म्हणाले की, मला असे वाटते की, जर पाकिस्तानने आपल्यासाठी दरवाजे उघडले आहेत तर आपणही त्या दिशेने पुढे गेले पाहिजे. ते म्हणाले की, हा सिनेमा पाकिस्तानच्या कराचीमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. बुधवारचा रात्री ११ वाजताचा शो हाऊसफुल होता. तर कराची, रावळपिंडी आणि हैदराबादमध्ये (सिंध) दुपारी तीन, संध्याकाळी सहा आणि नऊ वाजताचे शोही लावण्यात आले आहेत. शुक्रवारपर्यंत संपूर्ण पाकिस्तानमध्ये हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येईल.

ते पुढे म्हणाले की, पाकिस्तानमध्ये काबिलला बुधवारी रात्री ९ वाजता सेन्सॉर बोर्डाचे सर्टिफिकेट मिळाले होते. हृतिक रोशनची यात मुख्य भूमिका आहे. हृतिकनेही, पाकिस्तानमध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत म्हटले होते की, भारतात ज्या पद्धतीने काबिलला चांगला प्रतिसाद मिळाला अगदी त्याच पद्धतीने पाकिस्तानमध्येही मिळेल अशी आशा आहे.