दिवाळीच्या मुहूर्तावर अभिनेता आमिर खानचा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच आमिर आणि अमिताभ बच्चन एकत्र आले. त्यामुळे प्रेक्षकांना चित्रपटाकडून भरपूर अपेक्षा होती. व्हीएफएक्स, मोठमोठ्या कलाकारांची वर्णी, तगडी स्टारकास्ट, भरपूर खर्च असं एवढं सगळं पॅकेज असताना चित्रपट प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करेल अशी आशा होती. पण याउलट ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ने प्रेक्षकांची सपशेल निराशा केली. सोशल मीडियावर या चित्रपटाला ट्रोल करणारे बरेच मीम्स व्हायरल होत आहेत. अशातच या चित्रपटाच्या नावाखाली एका चप्पल विक्रेत्याने मार्केटिंगचा अनोखा फंडा वापरला आहे.
‘वहाण’ या कोल्हापुरी चप्पल विक्रेत्याच्या फेसबुक पेजवरील ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटासंदर्भातील एक पोस्ट विशेष लक्ष वेधून घेत आहे. ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान नामक आपत्तीत सापडलेल्या सर्वांबाबतीत वहाण सहानुभूती व्यक्त करत आहे. तरी तुमचं दुःख कमी करण्यास वहाण सदैव प्रयत्नशील राहिला आहे. आजही तुमचा तिकीटासोबतचा फोटो आम्हाला पाठवा आणि वहाण खरेदीत तिकीटाच्या रकमेची सूट मिळवा. तुम्ही आधीच खूप सहन केलंय निदान पैसे वाया जाण्यापासून तरी वहाण वाचवू शकतो,’ अशी ही पोस्ट आहे.
वाचा : लेन्सच्या भीतीने चित्रपटाला नकार दिला होता- सुबोध
एकीकडे सोशल मीडियावर आमिरचा हा चित्रपट ट्रोल होत असतानाच बॉक्स ऑफीसवरील कमाईत मात्र तसूभरही फरक पडला नाही. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ५० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 10, 2018 11:50 am