ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली यांची भारताच्या पन्नासाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ज्युरी समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी सकाळी गोवा येथे जाहीर केले. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेदेखील हजर होते. या ज्युरी समितीमध्ये मधुर भंडारकर, शाजी एन. अरुण, राहुल रवैल, मंजू बोराह, कॅमेरामन अपूर्बा किशोर बीर आणि रवि कोटारकारा यांचा समावेश आहे.

पणजी येथे २० ते २८ नोव्हेंबर या कालावधीत या चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. देश-विदेशातील उत्तम चित्रपट कलाकृतींचा यात समावेश असतो. अलिकडेच मराठी राज्य चित्रपट महोत्सवासाठी जॉन बेली आणि त्यांच्या पत्नी करोल विशेष पाहुणे म्हणून हजर होते. अशा पध्दतीने ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष भारतात येण्याचा हा पहिलाच योग होता आणि आता ते भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी येत आहेत. या संदर्भात ऑस्कर अकादमीचे सदस्य व चित्रपट अभ्यासक उज्जल निरगुडकर यांनी विशेष प्रयत्न केले आणि त्यास यश आले.