सोशल मीडियावर अनेक कलाकार त्यांच्या कपड्यांवरून किंवा मग त्यांच्या दिसण्यावरून ट्रोल होताना दिसतात. नुकत्याच दिलेल्या एक मुलाखतीत बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूजने बॉडी शेमिंग आणि सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगवर वक्तव्य केलं आहे.

इलियाने नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी तिच्या विषयी बोलताना म्हणाली, “असे दिवस होते जेव्हा मी स्वत:ला आरशात बघितल्या नंतर मला स्वत:चा तिरस्कार वाटायचा. पण आता फरक इतकाच आहे की मी आरशात स्वत:ला पाहण्यासाठी स्वत:मध्ये एक चांगली गोष्ट शोधून काढते जी मला आवडते.”

पुढे ती म्हणाली, “आपल्या शरिराचा आकार कसा ही असो, तुम्ही तुमच्या आयुष्यात काय करता या गोष्टींची पर्वा तुम्हाला नसते, आपण नेहमीच स्वत:मध्ये चुका काढत असतो. सगळ्यात मोठी चुक अशी आहे की आपण लोकांना आपल्याला ज्या गोष्टींची भीती आहे त्याबद्दल विचारतो आणि त्यांना आपण कसे आहोत याचे प्रमाणपत्र द्यायला सांगतो.”

पुढे ती म्हणाली की,” जेव्हा आपण स्वत:ला जसे आहोत तसे स्वीकारतो तेव्हा हीच गोष्ट आपल्याला आणखी सुंदर बनवते. मला असं वाटतं की जे लोकं स्वत:चा स्वीकार करत नाही त्या प्रत्येकाने हे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.”

इलियाना लवकरच ‘अनफेअर आणि लव्हली’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच तिच्यासोबत अभिनेता रणदीप हुड्डा दिसणार आहे. सोबतच अभिनेता अभिषेक बच्चनच्या ‘द बिग बुल’ या चित्रपटात ती सहाय्यक भूमिकेत दिसणार आहे.