30 September 2020

News Flash

मी नायक नाही, कलाकार आहे..

विविधांगी भूमिका साकारणारा नवाज सांगतो, काम करताना कधी एकाच प्रकारच्या भूमिकेत अडकायची वेळ माझ्यावर आली नाही.

(संग्रहित छायाचित्र)

भक्ती परब

बॉलीवूडमधील एक लक्ष्यवेधी अभिनेता म्हणून नवाजुद्दीन सिद्दीकीने स्वत:ला सिद्ध केले आहे. असं म्हणतात की जी व्यक्ती शून्यापासून सुरुवात करते, ती व्यक्ती आयुष्यात मोठी उंची गाठते. नवाजच्या बाबतीतही असंच घडलं. १९९९ मध्ये अभिनय क्षेत्रात त्यानं पाऊ ल टाकलं. तरी खरी सुरुवात २०१२ मध्येच झाली. त्या वर्षी त्याला एकाच वेळी चार चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ‘पीपली लाइव्ह’ ते ‘सेक्रेड गेम्स’ आणि आता ‘ठाकरे’ या चित्रपटापर्यंत त्याने साकारलेल्या व्यक्तिरेखांसाठी त्याचं नेहमीच कौतुक झालं..

अभिनेत्यासाठी एखादी व्यक्तिरेखा आव्हानात्मक असणं महत्त्वाचं असतं. सरफरोश चित्रपटापासून ते ठाकरे चित्रपटापर्यंत व्यक्तिगत आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्यातही नवाजला खूप उतार-चढावातून जावं लागलं.

‘सरफरोश’पासून काही चित्रपटांमध्ये एक दृश्यापुरता अभिनय करायला मिळाला, नंतर दोन-तीन दृश्यं मिळाली, मग २०१२ नंतर चांगल्या भूमिका मिळायला सुरुवात झाली. ही खरी सुरुवात मानतो. आता मुख्य भूमिका मिळू लागल्यात. आजवर केलेल्या कामातून पुढे मला संधी मिळत गेल्या. अशीही वेळ आली होती, जेव्हा हातात काहीच काम नव्हतं. पण अशी वेळ येते तेव्हाच खूप काही शिकायला मिळतं. त्या वेळी मी खचून गेलो नाही. अभिनयाची जबरदस्त इच्छा होती. त्या रिकाम्या वेळातही अभिनयाविषयीच मित्रांशी गप्पा मारत बसायचो. चर्चा करायचो, असं नवाज म्हणाला.

विविधांगी भूमिका साकारणारा नवाज सांगतो, काम करताना कधी एकाच प्रकारच्या भूमिकेत अडकायची वेळ माझ्यावर आली नाही. कारण ती नायकावर येते, मी नायक नाही. कलाकार आहे. खास माझे चित्रपट पाहण्यासाठी कुणी चित्रपटगृहात जात नाही. गेल्या ६० वर्षांपासून आपण नायकाला तसंच बघत आलो आहोत. त्यात बदल झालेला नाही. मी ‘ठाकरें’ची भूमिका करतो, ‘मंटो’ची करतो आणि ‘गणेश गायतोंडे’सुद्धा होतो. मला कुठल्याही साच्यात अडकण्याची भीती वाटत नाही. मला माझी गुडी गुडी प्रतिमा प्रेक्षकांसमोर बनवायची नाही. भविष्यात कधी सुफी संताची भूमिका करेन, तर कधी चोर-दरोडेखोराची भूमिकाही करेन. कारण माझं असं स्वत:चं कुठलं तत्त्वज्ञान नाहीये. सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊ न मला एक सच्चा कलावंत व्हायचंय. वेगवेगळ्या भूमिका बॉलीवूडमध्ये मला साकारायला मिळाल्या. ज्यांचा प्रयोगशीलतेवर विश्वास आहे, त्यांच्याबरोबर मला काम करायला मिळालं. मलाही तेच हवं होतं. ‘मंटो’ चित्रपट चालणार नाही, हे मनातून कुठेतरी माहीत होतं. पण त्याच्या चित्रीकरणादरम्यान मला जे शिकायला मिळालं ते कधीच विसरणार नाही. ‘मंटो’, ‘रमण राघव’ चित्रपटाला प्रेक्षकांनी स्वीकारलं नाही याची खंतही वाटते.

नवाजने साकारलेल्या भूमिका गाजल्या त्याचबरोबर त्याचे संवादही गाजले. म्हणून संवादांना किती महत्त्व देतोस असं विचारल्यावर तो म्हणतो, हे सगळं त्या त्या चित्रपटाच्या मांडणीवर अवलंबून आहे. कथेमध्येच संवादांची आवश्यकता आहे, असं दिसलं तर तसे तडाखेबाज संवाद असलेच पाहिजेत. संवादांसाठी संवाद नसावेत तर त्या व्यक्तिरेखेच्या प्रभावीपणासाठी त्याच्या मागणीनुसार ते आले पाहिजेत.

नवाज ‘पीपली लाइव्ह’मध्ये पत्रकाराच्या भूमिकेत होता, ठाकरेंच्या व्यक्तिमत्त्वातही पत्रकारितेचा महत्त्वपूर्ण पैलू आहे. तसंच त्याच्या ‘पतंग’ चित्रपटातील भूमिकेची बर्लिन चित्रपट महोत्सवात जगप्रसिद्ध चित्रपट समीक्षक रॉजर एबर्ट यांनी स्तुती केली होती. याबद्दल तो म्हणाला, माझे काही मित्र पत्रकार आहेत. ते समाजात वावरत असतात, त्यांच्याकडून एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन मिळतो. ही एक प्रकारची त्यांनी केलेली मदतच आहे.

मराठी चित्रपटसृष्टीविषयी नवाज म्हणतो की आपल्या देशात जास्तीतजास्त चांगले चित्रपट मराठीत बनत आहेत. खरंतर बॉलीवूडपेक्षा वेगळे प्रयोग मराठीत होत आहेत.

अलीकडे वादग्रस्त व्यक्तिमत्त्वांवर चरित्रपट येत आहेत, अशी वादग्रस्त व्यक्तिमत्त्वं असलेले चरित्रपटच यशस्वी होतात, अशी धारणा होतेय का?, असं विचारल्यावर तो म्हणाला, असं नाहीये.. काही व्यक्तिमत्त्वं अशी असतात की त्यांची कारकीर्दच वादळी असते. ती जशी आहे तशी दाखवण्यात यावी. त्यातला खरेपणा प्रेक्षकांना भावला पाहिजे. तो खरेपणा भावला तरच असे चित्रपट यशस्वी होतात, असं मत त्याने मांडलं. गेल्या ३०-४० वर्षांपासून सर्वगुणसंपन्न नायक असलेल्या व्यक्तिरेखेचा स्वीकार केला गेला. पण अलीकडे आलेल्या चरित्रात्मक चित्रपटात नायकाच्या चांगल्या गुणांबरोबर त्याचे काही वाईट गुणही तितक्याच प्रमाणात दाखवले जातात. पण प्रेक्षक हे स्वीकारू शकले नाहीत. कारण ते अजूनही सर्वगुणसंपन्न नायकाच्या प्रेमात आहेत. बाळासाहेबांच्या आयुष्यातही खूप चढ-उतार आणि संघर्षांचे अनेक प्रसंग आले. त्यांच्यासाठी एक चित्रपट करून भागणार नाही, तर वेबसिरीज यायला हवी. त्यांच्यातील कलेचा पैलू अधिक भावला.

‘ठाकरे’ चित्रपटाविषयी बोलताना तो म्हणाला, बाळासाहेबांच्या भूमिकेची विचारणा झाली तेव्हा आश्चर्य वाटलं, त्याचबरोबर खूप मेहनत घ्यावी लागणार याची जाणीवही झाली. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांत एकत्रच चित्रीकरण करत होतो. त्यामुळे मराठी भाषा शिकायला सुरुवात केली. मराठी चित्रपटात मी सगळे संवाद मराठीतून म्हटले आहेत, पण त्याचे डबिंग मराठीतून केले नाही. कारण असे काही जबरदस्त प्रभाव टाकणारे घटना प्रसंग होते, तिथे माझ्या भाषेकडे लक्ष गेलं तर प्रेक्षक मी साकारत असलेल्या भूमिकेकडे पाहणं सोडतील. त्यामुळे डबिंगसाठी दुसरा आवाज देण्याचं ठरलं, असं नावाजने सांगितलं.

नवाजच्या ‘फोटोग्राफ’ चित्रपटाचा सनडान्स या प्रतिष्ठेच्या महोत्सवामध्ये प्रीमियर होत आहे. पण ‘सेक्रेड गेम २’ च्या दुसऱ्या पर्वाचे चित्रीकरण सुरू झाल्याने तो तिकडे जाऊ  शकत नाहीये. तो चित्रपट नंतर बर्लिन चित्रपट महोत्सवामध्येही दाखवला जाणार आहे. सध्या ‘रोम रोम’, ‘फोटोग्राफ’ आणि अभिनेत्री राधिका आपटेबरोबर ‘रात अकेली है’ अशा प्रेमकथा असलेल्या आगामी पाच चित्रपटांमध्ये तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे ‘सेक्रेड गेम्स’च्या दुसऱ्या पर्वानंतर प्रेमळ नायक म्हणून मी प्रेक्षकांना भेटणार आहे, त्यासाठी एक कलाकार म्हणून उत्सुक असल्याचं त्यानं सांगितलं.

माझी स्वत:ची अशी कुठली विचारधारा नाही, कुठलेही तत्त्वज्ञान मी मानत नाही. या जन्मी मला फक्त कलावंत म्हणूनच राहायचं आहे. माझ्या आयुष्यात खूप नकार पचवले असून हलाखीत जगलो आहे. त्या वेळीही मी माझ्या अभिनयावर लक्ष केंद्रित करणं सोडलं नाही. समाजात प्रत्येकाने प्रामाणिकपणे वागायला सुरुवात केली तर समाज सुधारेल.

– नवाजुद्दीन सिद्दीकी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2019 1:33 am

Web Title: im a artist not an hero says nawazuddin siddiqui
Next Stories
1 पुन्हा एकदा रीमिक्स..
2 राजकीय मुखवटे
3 ..तर मी नाटय़व्यवसाय सोडणार होतो!
Just Now!
X