18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

सुनील ग्रोवरने केली प्रेक्षकांची निराशा

सुनील ग्रोवरऐवजी कार्यक्रमात संकेत भोसलेने मारली बाजी

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: June 19, 2017 11:18 AM

'सुपरनाइट विथ ट्युबलाइट'

‘सुपरनाइट विथ ट्युबलाइट’ हा दोन तासांचा विशेष कार्यक्रम नुकताच सोनी वाहिनीवर प्रसारित झाला. आगामी सिनेमा ‘ट्युबलाइट’च्या प्रमोशनसाठी झालेल्या या कार्यक्रमात सलमान खान आणि सोहेल खानने हजेरी लावली. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये एक काळ गाजवणारे सुनील ग्रोवर, चंदन प्रभाकर, सुगंधा मिश्रा, अली असगर आणि संकेत भोसले यांनी या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. मात्र प्रेक्षकांना या कार्यक्रमातून सुनील ग्रोवरकडून बऱ्याच अपेक्षा होत्या आणि त्या अपेक्षांची पूर्तता सुनीलकडून तेवढ्या प्रमाणात झाली नसल्याची सध्या चर्चा होतेय. तर या कार्यक्रमातून प्रेक्षकांची मनं जिंकणारा विनोदवीर ठरला संकेत भोसले.

कार्यक्रमाच्या पहिल्या भागात सुनील ग्रोवर डॉक्टर मशहूर गुलाटीच्या भूमिकेत आणि अली असगर नर्स लैलाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आले. मात्र यावेळी त्यांच्या विनोदाने तेवढी कमाल केली नाही. त्यानंतर अभिनेत्री मौनी रॉयने ‘सुपर डान्सर्स’ची विजेती दित्या आणि स्पर्धक मासूम आणि योगेशसोबत सलमानच्या गाण्यांवर नृत्य सादर केलं. त्यानंतर पुन्हा जेव्हा सुनील अमिताभ बच्चनच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आला, तेव्हाही त्याच्या विनोदांमध्ये नाविन्य नव्हते. त्यामुळे त्याच्या दोन्ही भूमिकांनी प्रेक्षकांची निराशा केली.

या कार्यक्रमाचा खरा विनोदवीर ठरला तो म्हणजे संकेत भोसले. संजय दत्तचा अंदाज आणि आपल्या आवाजाने त्याने सलमान आणि प्रेक्षकांना खळखळून हसण्यास भाग पाडले. अभिनयाच्या अनोख्या शैलीने संकेतने प्रेक्षकांची मनं जिंकली.

 वाचा : पुन्हा एकदा सलमान आणि लुलिया आले एकत्र

ईदच्या मुहूर्तावर सलमान खानचा ‘ट्युबलाइट’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटामध्ये १९६० च्या दशकातील काळ साकारण्यात आला असून, चित्रपटाचं बरंच चित्रीकरण लडाख, हिमाचल प्रदेश या भागांत करण्यात आलं आहे.

First Published on June 19, 2017 9:32 am

Web Title: in supernight with tubelight instead of sunil grover comedian sanket bhosale win hearts of the audience and salman khan