‘मिस वर्ल्ड २०१७’चा किताब भारताच्या मानुषी छिल्लरने पटकावला. जगात सौंदर्य स्पर्धांपैकी एक महत्त्वाची आणि सर्वांत लोकप्रिय स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिस वर्ल्ड स्पर्धेत तब्बल १७ वर्षांनंतर भारताच्या सौंदर्यवतीने बाजी मारली. हा किताब पटकावणारी मानुषी सहावी भारतीय महिला ठरली. विशेष म्हणजे यापूर्वी हा किताब जिंकलेल्या रिटा फारिया, ऐश्वर्या राय आणि आता मानुषीमध्ये एक योगायोग जुळून आला आहे. हा योगायोग आहे तारखांचा.

१७ नोव्हेंबर १९६६ रोजी रिटा फारिया या भारतीय तरुणीने ‘मिस वर्ल्ड’चा किताब आपल्या नावी केला होता. हा किताब पटकावणारी रिटा पहिली भारतीय आणि आशियाई महिला आहे. त्यानंतर १९ नोव्हेंबर १९९४ मध्ये ऐश्वर्या रायने ‘मिस वर्ल्ड’चा मुकुट पटकावला. आणि शनिवारी म्हणजेच १८ नोव्हेंबर २०१७ रोजी हरयाणाच्या मानुषी छिल्लरने सौंदर्य आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर ‘मिस वर्ल्ड २०१७’चा किताब आपल्या नावे केला. या तिघींनी स्पर्धा ज्या तारखांना जिंकली, त्या १७, १८ आणि १९ नोव्हेंबर अशा आहेत आणि हाच अनोखा योगायोग आहे.

१७-१८-१९ नोव्हेंबरचा हा योगायोग भारतासाठी मात्र सकारात्मक ठरला असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आजवर सहा भारतीय महिलांनी ‘मिस वर्ल्ड’ ही स्पर्धा जिंकली असून यामध्ये भारताचा व्हेनेझुएलाखालोखाल जगात दुसरा क्रमांक लागतो.